Sand Mafia :खडकपूर्णा धरण आणि नदीपात्र परिसरात अवैध रेतीउपशाचा उच्छाद इतका वाढला आहे की, महसूल विभागाच्या कारवायांना तस्करांकडून सरळसरळ आव्हान दिले जात आहे. अधिकारी कारवाईत व्यस्त असताना, काही महसूल कर्मचारी मात्र ‘माया जमवण्यात’ गुंतले असल्याची गंभीर चर्चा रंगली असून, यामुळे संपूर्ण यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

अधिकारी धडपडीत, कर्मचारी संगनमतात? रेती तस्करांचा उघड आव्हान
गजानन तिडके
देऊळगाव राजा : खडकपूर्णा धरण आणि नदीपात्र परिसरात अवैध रेतीउपशाचा उच्छाद इतका वाढला आहे की, महसूल विभागाच्या कारवायांना तस्करांकडून सरळसरळ आव्हान दिले जात आहे. अधिकारी कारवाईत व्यस्त असताना, काही महसूल कर्मचारी मात्र ‘माया जमवण्यात’ गुंतले असल्याची गंभीर चर्चा रंगली असून, यामुळे संपूर्ण यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
शेगावात भक्तिरसाचा दरवळ; १३२ वा श्रीरामनवमी उत्सव भक्तिभावात संपन्न
महसूल विभागाने विशेष पथके स्थापन करून कारवाई सुरू ठेवली असली, तरी प्रत्येक वेळी तस्कर आधीच सावध होत असल्याने अधिकारी पथकांना अनेकदा रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. यामागचे कारण अधिक धक्कादायक आहे—कारवाईसाठी निघालेल्या अधिकाऱ्यांचे लोकेशनच काही कर्मचाऱ्यांकडून तस्करांपर्यंत पोहोचत असल्याची चर्चा खुलेआम होत आहे. परिणामी, तस्कर बिनधास्तपणे आपले ‘नेटवर्क’ चालवत असून प्रशासन हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे.
ऋतू कोणताही असो, खडकपूर्णा नदीपात्रातून बोटीद्वारे मोठ्या प्रमाणावर रेती उपसा सुरू आहे. महसूल विभागाकडून टिप्पर जप्ती, दंडात्मक कारवाई, बोटी नष्ट करणे असे उपाय केले जात असले, तरी त्याचा परिणाम शून्य ठरत आहे. कारण दंड भरून तस्कर पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतात. त्यांच्या अवैध कमाईसमोर दंडाची रक्कम किरकोळ ठरत असल्याचे वास्तव आहे.
यामध्ये आणखी एक गंभीर बाब म्हणजे, कारवाई केवळ वाहनचालकांपुरती मर्यादित राहत आहे. मूळ मालक मात्र आडोशाला राहतात. जाणकारांच्या मते, अशा वाहनमालकांची नावे सार्वजनिक केल्यास आणि त्यांच्यावर थेट पोलिस कारवाई केल्यासच या साखळीला खीळ बसेल.
ग्रामपातळीवरील काही महसूल कर्मचाऱ्यांचे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून राहणेही संशयाला खतपाणी घालत आहे. १०-१५ वर्षे बदली न होता त्याच तालुक्यात कार्यरत असलेले कर्मचारी स्थानिक परिस्थिती, तस्कर आणि राजकीय गणितांशी जवळीक साधत असल्याची चर्चा आहे. यामुळेच संगनमताचे जाळे अधिक मजबूत झाल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते गिरीश वाघमारे यांनी या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया देत महसूल, पोलिस आणि परिवहन विभागाने संयुक्त कारवाई करण्याची मागणी केली आहे. “रेतीचा अवैध उपसा केवळ आर्थिक गुन्हा नसून पर्यावरणासाठीही घातक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
एकूणच, खडकपूर्णा परिसरात सुरू असलेल्या या ‘रेती राजकारणा’वर लगाम घालण्यासाठी केवळ दिखाऊ कारवाई नव्हे, तर संगनमत उघड करून कडक आणि ठोस पावले उचलण्याची गरज आता तीव्रतेने जाणवत आहे.
रेतीसंदर्भात कारवाईसाठी जाणाऱ्या अधिकारी पथकाची माहिती स्थानिक पातळीवर महसूल कर्मचारी रेती तस्करांना देत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. तसेच वर्षानुवर्षे एकाच तालुक्यात कार्यरत असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करून वरिष्ठ कार्यालयाकडे सविस्तर अहवाल सादर करण्यात येईल व त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
— प्रा. संजय खडसे, उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा

