Daring burglary in Khamgaon : शहरातील वृंदावन नगर वाडी परिसरात मंगळवारी पहाटे घरफोडीची धक्कादायक घटना घडली. अज्ञात तीन चोरट्यांनी घरात घुसून चोरी करताना विरोध केल्यामुळे घरातील बाप–लेकावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेत चोरट्यांनी सुमारे ८२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खामगाव : शहरातील वृंदावन नगर वाडी परिसरात मंगळवारी पहाटे घरफोडीची धक्कादायक घटना घडली. अज्ञात तीन चोरट्यांनी घरात घुसून चोरी करताना विरोध केल्यामुळे घरातील बाप–लेकावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेत चोरट्यांनी सुमारे ८२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी संतोष मनोज अग्रवाल (वय ४६, व्यवसाय – अंगणवाडी सेविका) या कुटुंबीयांसह वृंदावन नगर वाडी येथे वास्तव्यास आहेत. २७ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ३ ते ३.३० वाजेदरम्यान कुटुंबीय घरातील मागील खोलीत झोपलेले असताना, त्यांच्या सासूबाई हॉलमध्ये झोपलेल्या होत्या. याच दरम्यान तीन अनोळखी इसमांनी घरात प्रवेश केला. सासूबाईंनी आरडाओरड केल्यानंतर घरातील सदस्य हॉलमध्ये आले असता चोरटे दिसून आले. “चोर, चोर” अशी आरोळी दिल्यानंतर फिर्यादींचे पती मनोज अग्रवाल यांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्यांनी लोखंडी सळई व चाकूने हल्ला करून त्यांच्या हातावर व पायावर गंभीर वार केले.
दरम्यान, फिर्यादींचा मुलगा मयंक अग्रवाल याने एक आरोपी पकडण्याचा प्रयत्न केला असता, दुसऱ्या आरोपीने त्याच्या हातावर, छातीवर व मांडीवर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर चोरट्यांनी सासूबाईंच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरदस्तीने काढून घेतली. तसेच बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने व रोख ३० हजार रुपये, असा एकूण ८२ हजार रुपयांचा ऐवज घेऊन ते फरार झाले.
या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास पाटील पुढील तपास करीत असून, या घटनेमुळे वाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

