Mahabreaking

[breaking_news]

Crackdown : जालना-पुलगाव महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाईचा हातोडा; सात दिवसांत जागा रिकामी करण्याचे आदेश

Crackdown : जालना ते पुलगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३C वरील अनधिकृत अतिक्रमणांविरोधात राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. महामार्गाच्या हद्दीत विनापरवाना करण्यात आलेले अतिक्रमण तात्काळ हटविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने संबंधितांना प्राथमिक नोटीस बजावण्यात आली आहे.

Crackdown

महामार्ग हद्दीतील अतिक्रमणांना नोटिसा; गावकऱ्यांची आधी मोजणी करण्याची मागणी

डोणगाव : जालना ते पुलगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३C वरील अनधिकृत अतिक्रमणांविरोधात राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. महामार्गाच्या हद्दीत विनापरवाना करण्यात आलेले अतिक्रमण तात्काळ हटविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने संबंधितांना प्राथमिक नोटीस बजावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीची नियतकालिक पाहणी करण्यात आली असता, जालना-पुलगाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३C वरील किमी ९५/८०० जवळ विनापरवाना व अनधिकृत अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्रशासन तसेच कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, अमरावती यांच्या वतीने संबंधितांना अधिकृत नोटीस बजावण्यात आली आहे.

सात दिवसांत अतिक्रमण हटविण्याचे निर्देश

नोटीस बजावल्याच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत संबंधितांनी स्वतःहून अनधिकृत अतिक्रमण हटवावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत. निर्धारित मुदतीत अतिक्रमण न हटविल्यास किंवा त्याबाबत योग्य स्पष्टीकरण न दिल्यास, संबंधित कायद्यांनुसार प्रशासनामार्फत अतिक्रमण निष्कासित करण्यात येईल. या कारवाईसाठी येणारा खर्च तसेच पुढील कायदेशीर कारवाईची जबाबदारी संबंधितांवर राहील, असा इशाराही नोटीसमधून देण्यात आला आहे.

तीन दिवसांत म्हणणे मांडण्याची संधी

दरम्यान, संबंधित घटकांना नोटीसबाबत आपले म्हणणे अथवा निवेदन सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. नोटीस बजावल्यापासून तीन दिवसांच्या आत सक्षम प्राधिकाऱ्याकडे आपले स्पष्टीकरण सादर करता येणार आहे.
दरम्यान, डोणगाव येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गाचे कनिष्ठ अभियंता योगेश काळमेघ यांच्याकडे प्रथम महामार्गाच्या हद्दीची अधिकृत मोजणी करून त्यानंतरच अतिक्रमण निश्चित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. महामार्गाच्या हद्दीबाबत स्पष्टता झाल्यानंतरच कारवाई करावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
दुसरीकडे, अतिक्रमण हटविण्याच्या या मोहिमेमुळे महामार्गालगत किरकोळ व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अतिक्रमण हटविल्यानंतर व्यवसाय कुठे करायचा, असा प्रश्न या व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे प्रशासनाने कारवाईसोबतच पर्यायी जागेबाबतही विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top