Mahabreaking

[breaking_news]

District Collector : पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करा; एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहू नये – जिल्हाधिकारी डॉ. देवरे

District Collector : सिंदखेडराजा तालुक्यात निर्माण झालेली कोरड्या दुष्काळाची परिस्थिती, पावसाच्या ताणामुळे शेती पिकांचे झालेले नुकसान, संभाव्य चारा व पाणीटंचाई तसेच आगामी काळात निर्माण होणाऱ्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

District Collector

सिंदखेडराजा तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचा आढावा; पंचनामे, चारा व पाणीटंचाईवर प्रशासनाचा ‘ॲक्शन प्लॅन’

अशोक इंगळे

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात निर्माण झालेली कोरड्या दुष्काळाची परिस्थिती, पावसाच्या ताणामुळे शेती पिकांचे झालेले नुकसान, संभाव्य चारा व पाणीटंचाई तसेच आगामी काळात निर्माण होणाऱ्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. दुष्काळाच्या काळात शेतकरी, नागरिक आणि पशुधनाला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने आणि तत्परतेने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करा

पावसाच्या ताणामुळे तसेच कोरड्या दुष्काळामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील उर्वरित सर्व शेती पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी दिले.

पंचनामे करताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. पंचनाम्याची कार्यवाही पारदर्शक, वस्तुनिष्ठ आणि प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चारा व पाण्याचे आतापासूनच नियोजन करा

आगामी काळात पशुधनासाठी चारा व पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता चारा छावण्या, चारा डेपो तसेच पशुखाद्याची उपलब्धता याबाबत आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.

पशुधनाची संख्या आणि संभाव्य गरज लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांचा कृती आराखडा तयार ठेवावा. भविष्यात परिस्थिती गंभीर झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी त्यापूर्वीच आवश्यक नियोजन पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

पाणीटंचाईग्रस्त गावांची यादी तयार करा

तालुक्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या गावांची तातडीने यादी तयार करून आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा, विहिरींचे अधिग्रहण, नळ योजनांची दुरुस्ती तसेच इतर पर्यायी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नागरिकांना भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी आतापासूनच पूर्वनियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी दिले.

टंचाई निवारणासाठी प्रशासन सज्ज

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे म्हणाले, “तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना दुष्काळाच्या काळात सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन व प्रशासन कटिबद्ध आहे. टंचाई निवारणाच्या कामात कोणतीही हलगर्जी किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन आवश्यक त्या उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात.”

बैठकीस उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे, गटविकास अधिकारी अजित बांगर, मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे, तालुका कृषी अधिकारी भुते, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी भोसले, पंचायत समिती तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीअंती सर्व संबंधित विभागांना दुष्काळ व टंचाईच्या परिस्थितीवर प्रभावीपणे मात करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच करण्यात आलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top