Mahabreaking

[breaking_news]

water scarcity :देऊळगाव राजा तालुक्यात पाणीटंचाईचा संभाव्य धोका; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासनाचा आढावा

water scarcity : देऊळगाव राजा तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी मंगळवारी तहसील कार्यालय, देऊळगाव राजा येथे विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

water scarcity

पाणीटंचाई, चारा व पिकांच्या स्थितीवर प्रशासनाची नजर; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे निर्देश

गजानन तिडके

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी मंगळवारी तहसील कार्यालय, देऊळगाव राजा येथे विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

या बैठकीस सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, महसूल मंडळ अधिकारी तसेच विविध संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावे व वाड्या-वस्त्या, विहिरी व इतर जलस्रोतांची स्थिती, टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची आवश्यकता, चारा व पशुधनाची उपलब्धता, कृषी पिकांची परिस्थिती तसेच दुष्काळ निवारणाच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता संबंधित विभागांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पाणीपुरवठा योजनांची नियमित पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत. उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन करून नागरिकांना पुरेसा व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होईल, यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी दिल्या.

पाणीटंचाईग्रस्त भागात परिस्थितीनुसार तातडीच्या उपाययोजना करता याव्यात, यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी. नागरिकांना पिण्याच्या पाण्याबाबत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, यासाठी स्थानिक प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

तसेच तालुक्यातील चारा, पशुधन व कृषी पिकांच्या परिस्थितीवरही बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.

जांभोरा येथे पिकांची पाहणी

आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी मौजे जांभोरा येथील शेतशिवारास भेट देऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून पिकांची सद्यस्थिती, पाण्याची उपलब्धता, पावसाची स्थिती तसेच पिकांवर झालेल्या परिणामाबाबत माहिती जाणून घेतली.

तालुक्यातील पाणीटंचाई, दुष्काळसदृश परिस्थिती तसेच कृषी परिस्थितीवर प्रशासनाचे सातत्याने लक्ष असून, नागरिक व शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा व मदत उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने व तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top