Clash between two groups : तालुक्यातील रोहणा येथील शेतशिवारात शेतीच्या बांधावरील खुणेच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना रोहणा शिवारात घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटाच्या पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन तिडके
देऊळगाव राजा : तालुक्यातील रोहणा येथील शेतशिवारात शेतीच्या बांधावरील खुणेच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना रोहणा शिवारात घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटाच्या पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 36 वर्षीय महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी कैलास कडुबा डोके व ज्ञानेश्वर कडुबा डोके (दोघेही रा. रोहणा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना 22 जून रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास रोहणा येथील शेतशिवारात घडली. फिर्यादी यांनी आरोपींना शेतीच्या बांधावरील खुण का उपटली, असा जाब विचारला. याचा राग आल्याने दोन्ही आरोपींनी संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या पतीला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच फिर्यादीच्या पतीच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद सोडविण्यासाठी फिर्यादी मध्यस्थी करत असताना आरोपी कैलास डोके याने फिर्यादीचा हात धरून धक्काबुक्की व झटापट केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे फिर्यादीची लज्जा भंग झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय आरोपींनी फिर्यादीला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटाच्या गिरीजाबाई कडुबा डोके (वय ५१, रा. रोहणा, ता. देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारभारी देविदास डोके, लक्ष्मी कारभारी डोके व शिवराज कारभारी डोके (सर्व रा. रोहणा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, २९६, ११५(२), ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, २२ जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास रोहणा येथील शेतशिवारात सामाईक धुऱ्यावर शेतातील दगड का टाकले नाहीत, या कारणावरून वाद निर्माण झाला. यावेळी आरोपी कारभारी डोके यांनी फिर्यादी महिलेस अश्लील व अपमानास्पद शब्दांत शिवीगाळ केली. तसेच तिच्या पतीच्या निधनाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून तिचा हात पकडून जवळ ओढल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकारामुळे आपली लज्जा भंग झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार शरद साळवे करीत आहेत.

