Demand for an inquiry : शहरातील गंगानगर परिसरात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामावर स्थानिक नागरिकांनी गंभीर आक्षेप घेतले असून या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांच्या स्थानिक विकास निधीतून हुसेनी मॉलसमोरून गंगानगर एस.एस. किराणा दुकानापर्यंत सिमेंट रस्ता बांधण्यात येत आहे.

अकोला : शहरातील गंगानगर परिसरात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामावर स्थानिक नागरिकांनी गंभीर आक्षेप घेतले असून या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांच्या स्थानिक विकास निधीतून हुसेनी मॉलसमोरून गंगानगर एस.एस. किराणा दुकानापर्यंत सिमेंट रस्ता बांधण्यात येत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सिमेंट रस्ता तयार करण्यापूर्वी रस्त्याचा पाया मजबूत करण्यासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्णपणे राबविण्यात आलेली नाही. रस्ता खोदून त्यामध्ये एम-४० दर्जाची गिट्टी, मुरूम टाकून त्यावर पुरेसे पाणी मारत रोड रोलरद्वारे दाब देणे आवश्यक असते.
नागरिकांच्या माहितीनुसार, सिमेंट रस्त्यावर सुमारे चार इंच जाडीचा थर टाकण्यात आला आहे. मात्र सिमेंट काँक्रीटच्या कामानंतर त्यावर नियमित पाणी मारणे ही अत्यंत आवश्यक प्रक्रिया असताना गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कामावर अद्याप पाणी मारण्यात आले नसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
याशिवाय, कामाच्या ठिकाणी प्रकल्पाचा तपशील देणारा कोणताही माहिती फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे हे काम नेमके कोणत्या निधीतून, किती खर्चातून आणि कोणत्या कंत्राटदारामार्फत केले जात आहे, याची माहिती नागरिकांना उपलब्ध होत नसल्याची तक्रार आहे. सार्वजनिक निधीतून होणाऱ्या विकासकामांबाबत पारदर्शकता असणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
संबंधित यंत्रणेने या कामाची तातडीने गुणवत्ता तपासणी करावी, सिमेंट रस्त्यावर आवश्यक तेवढे पाणी मारण्याबाबत कंत्राटदारास निर्देश द्यावेत तसेच कामाचा संपूर्ण तपशील दर्शविणारा फलक उभारावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी करावी आणि गुणवत्तेची खात्री झाल्यानंतरच संबंधित कंत्राटदाराची देयके अदा करावीत, अशी मागणीही स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

