murder : तालुक्यातील निंबी शिवारात ३० जून रोजी घडलेल्या युवकाच्या खूनप्रकरणातील सहा आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) अकोला आणि बार्शीटाकळी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत ताब्यात घेतले. शेतीच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अनिकेत भास्कर इंगळे (रा. अशोकनगर, बार्शीटाकळी) असे मृतकाचे नाव आहे.

निंबी शिवारातील युवकाच्या खूनप्रकरणाचा १२ तासांत लावला छडा; शेतीच्या वादातून झाली होती हत्या
बबन इंगळे
बार्शीटाकळी : तालुक्यातील निंबी शिवारात ३० जून रोजी घडलेल्या युवकाच्या खूनप्रकरणातील सहा आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) अकोला आणि बार्शीटाकळी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत ताब्यात घेतले. शेतीच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अनिकेत भास्कर इंगळे (रा. अशोकनगर, बार्शीटाकळी) असे मृतकाचे नाव आहे.

आरोपींनी अनिकेतच्या डोळ्यात मिरची पावडर मिसळलेले पाणी टाकून त्याच्यावर हातोड्याने वार करत त्याला ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर आणि बार्शीटाकळीचे पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांना आरोपींना तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार एलसीबी आणि बार्शीटाकळी पोलिसांची संयुक्त पथके तयार करून विविध ठिकाणी रवाना करण्यात आली.

बार्शीटाकळी पोलिसांच्या पथकाने रात्रभर तालुक्यात विविध ठिकाणी शोधमोहीम राबविली. बसस्थानके, खाजगी वाहनतळ तसेच इतर संवेदनशील ठिकाणी कसून तपास करण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे सुरेश हरिभाऊ करवते, रेखा सुरेश करवते, अस्मिता विनोद सुरवाडे आणि माधुरी अमोल करवते यांना बार्शीटाकळी पोलिसांनी ताब्यात घेतले. तर पळून जाण्याच्या तयारीत असलेले विशाल सुरेश करवते आणि अमोल सुरेश करवते (रा. निंबी) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पातूर येथून ताब्यात घेतले.
या खूनप्रकरणी मृतकाची आई प्रार्थना भास्कर इंगळे यांच्या फिर्यादीवरून १ जुलै रोजी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, बार्शीटाकळीचे पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ, एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख व गोपाल जाधव, बार्शीटाकळीचे पोलीस उपनिरीक्षक बाळू पवार तसेच एलसीबी आणि बार्शीटाकळी पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

