Honourable farewell : बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार 30 जून 2026 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेला सलाम करत बुलढाणा पोलीस कल्याण शाखेच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात सन्मानपूर्वक सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभाला सेवानिवृत्त अधिकारी-अंमलदारांसह त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

बुलढाणा पोलीस मुख्यालयात निरोप समारंभ; तीन दशकांहून अधिक सेवेला सन्मानाचा मुजरा
बुलढाणा : बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार 30 जून 2026 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेला सलाम करत बुलढाणा पोलीस कल्याण शाखेच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात सन्मानपूर्वक सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभाला सेवानिवृत्त अधिकारी-अंमलदारांसह त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलढाणा येथे सायंकाळी 4 वाजता झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि प्रभारी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) तथा पोलीस निरीक्षक बी. डी. पावरा प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, सेवानिवृत्ती प्रमाणपत्र, मोमेंटो, झाडांचे रोपटे आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वांना निरोगी व आनंदी भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.
या निरोप समारंभात पोलीस दलात विविध शाखा, पोलीस ठाणे आणि नियंत्रण कक्षात दीर्घकाळ सेवा बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक शामकुमार उद्धवराव जोशी (अर्जशाखा, बुलढाणा), राजेश नारायण गोमासे (पोलीस स्टेशन खामगाव शहर), अनिल सदाशिव भुसारी (जिल्हा वाहतूक शाखा), सैय्यद हारुण सैय्यद इसा, शिवानंद कान्हुजी वीर, विक्रम फकीरा काकड, राजकुमारसिंग रतनसिंग राजपूत (नियंत्रण कक्ष, बुलढाणा) यांचा समावेश होता.
तसेच जीपीएसआय शेख हुसेन कन्हैय्या पटेल (गजानन महाराज मंदिर सुरक्षा), सुधाकर प्रभाकर तारकसे (पोलीस स्टेशन बुलढाणा शहर), सुभाष तुळशिराम वाघोदे (पोलीस स्टेशन जळगाव जामोद), ओमप्रकाश गणपत कस्तुरे (सीसीटीएनएस), सफौ उल्हास नामदेव मुके (पोलीस स्टेशन मलकापूर ग्रामीण), अरुण अर्जुन हेलोडे (पोलीस स्टेशन खामगाव शहर), रामकिसन भीकाजी माळी (पोलीस स्टेशन तामगाव), सफी मोबीन शहा लतीफ शहा (पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीण), पोहेकॉ सिद्धार्थ उकर्डा रणित (पोलीस स्टेशन शिवाजीनगर), नापोकॉ सुधीर गणपतराव जोशी (पोलीस स्टेशन रायपूर) आणि पोकॉ ज्ञानदेव पुंडलिक ठाकरे (पोलीस स्टेशन पी. राजा) यांचाही सन्मान करण्यात आला.
समारंभादरम्यान उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाकाळातील कर्तव्यनिष्ठा, शिस्त, जनसेवा आणि पोलीस दलाप्रती असलेली बांधिलकी यांचा गौरव केला. अनेकांनी आपल्या सेवेतून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात, नियंत्रण कक्षातील जबाबदाऱ्या पार पाडण्यात, वाहतूक व्यवस्थापन, मंदिर सुरक्षा, ग्रामीण पोलीस ठाण्यांतील कामकाज आणि प्रशासकीय शाखांतील सेवा बजावण्यात मोलाचे योगदान दिले असल्याचे नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक हुडेकर, पोउपनि/शे. इद्रीस, सफौ गजानन लहासे, पोहेकॉ मोहन वानखेडे, पोहेकॉ सुनील जाधव, पोकॉ किशोर ताजने, पोकॉ गजानन तायडे, पोकॉ संदीप जाधव, मपोकॉ रेखा बकाल आणि मपोकॉ भारती जाधव यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोकॉ निलेश रत्नपारखी यांनी केले. विशेष म्हणजे या निरोप समारंभासाठी तब्बल 110 कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला भावनिक आणि कुटुंबवत्सल वातावरण लाभले. सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दीर्घ सेवेला सलाम करत त्यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.

