joint birth anniversary: अन्याय, विषमता आणि अंधश्रद्धेविरोधात आपल्या लेखणी व काव्यातून परिवर्तनाचा आवाज बुलंद करणारे महाकवी वामनदादा कर्डक आणि लोककवी प्रतापसिंग बोदडे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त बाळापूर तालुक्यातील देगाव येथे ३० सप्टेंबर रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या साहित्यिक व सामाजिक विचारांना अभिवादन करण्यात येणार आहे.

कविता-गीतांतून घुमणार बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार; देगावात नामवंत कलाकारांची मांदियाळी
वाडेगाव : अन्याय, विषमता आणि अंधश्रद्धेविरोधात आपल्या लेखणी व काव्यातून परिवर्तनाचा आवाज बुलंद करणारे महाकवी वामनदादा कर्डक आणि लोककवी प्रतापसिंग बोदडे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त बाळापूर तालुक्यातील देगाव येथे ३० सप्टेंबर रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या साहित्यिक व सामाजिक विचारांना अभिवादन करण्यात येणार आहे.
बुद्ध, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या कविता व गीतांमधून जनसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या या दोन्ही कवींना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कलाकार व कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन समाजकल्याण अधीक्षक खुरेद्र तिडके यांच्या हस्ते होणार असून पुरुषोत्तम अहीर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मंजुषा शिंदे, प्रज्ञा इंगळे, मनोज राजा गोसावी, कुणाल बोदडे, चेतन चोपडे, वैभव खुणे, नागसेन सावदेकर यांच्यासह अनेक कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
राजेंद्र पातोडे यांचा विशेष सत्कार
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित राज्याध्यक्ष राजेंद्र पातोडे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.
वामनदादा कर्डक आणि प्रतापसिंग बोदडे यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण करत त्यांच्या गीत-कवितांमधून सामाजिक परिवर्तन, समता आणि बंधुभावाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.
‘ही केवळ जयंती नसून विचारांचा जागर आहे; ही केवळ सभा नसून सामाजिक परिवर्तनाच्या सांस्कृतिक प्रवाहाला पुढे नेणारा उपक्रम आहे,’ अशी भूमिका आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील नागरिकांनी तसेच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक श्रीकृष्ण वानखेडे ,देवानंद अभोरे यांनी केले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

