Mahabreaking

[breaking_news]

One Village, One Ganpati :चान्नी पोलीस ठाणे हद्दीतील १२ गावांत ‘एक गाव, एक गणपती’; गावागावांत एकोप्याचे दर्शन

One Village, One Ganpati : भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाचा उत्साह संपूर्ण राज्यात पाहायला मिळत असताना, चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक एकोपा आणि शिस्तीचे आगळेवेगळे चित्र पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला आणि जनजागृतीला सकारात्मक प्रतिसाद देत चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ४५ गावांपैकी १२ गावांनी यावर्षी ‘एक गाव, एक गणपती’ ही कौतुकास्पद परंपरा कायम ठेवली आहे.

One Village

 गणेशोत्सवात एकीचा जागर! चान्नी हद्दीतील १२ गावांनी जपली ‘एक गाव, एक गणपती’ची परंपरा

राहुल सोनोने

दिग्रस बु. : भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाचा उत्साह संपूर्ण राज्यात पाहायला मिळत असताना, चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक एकोपा आणि शिस्तीचे आगळेवेगळे चित्र पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला आणि जनजागृतीला सकारात्मक प्रतिसाद देत चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ४५ गावांपैकी १२ गावांनी यावर्षी ‘एक गाव, एक गणपती’ ही कौतुकास्पद परंपरा कायम ठेवली आहे.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून गावातील एकजूट, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत व्हावा, तसेच अनावश्यक खर्चाला आळा बसावा, या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागात एकोप्याचे दर्शन घडत आहे.

चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ४५ गावे येतात. या गावांमध्ये यंदा एकूण ८० सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्साहात गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. गणेशोत्सवादरम्यान गावागावांत होणारी स्पर्धा, गटबाजी किंवा किरकोळ कारणांवरून निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी चान्नी पोलिसांच्या वतीने उत्सवापूर्वी विविध गावांमध्ये बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमाचे महत्त्व पटवून देत ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली.

पोलिसांच्या या आवाहनाला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या गावात एकच सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावातील नागरिक एकत्र येत असून, सामाजिक एकोपा आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ होत आहे.

या १२ गावांनी जपली एकतेची परंपरा

‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविणाऱ्या आदर्श गावांमध्ये पुढील १२ गावांचा समावेश आहे—

१. दिग्रस बु.

२. अंधारसांगवी

३. पांगरा

४. चतारी

५. जांब

६. सोनुना

७. झरंडी

८. सायवनी

९. अडगाव

१०. पिंपरडोळी

११. वनदेव

१२. पांगरताटी

या गावांनी गणेशोत्सवात एकतेचा संदेश देत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेमुळे अनावश्यक खर्चाला आळा बसण्यासोबतच गावातील नागरिकांमध्ये एकजूट वाढण्यास मदत होत आहे.

ठाणेदारांकडून उपक्रमाचे कौतुक

चान्नी पोलीस ठाण्याच्या वतीने राबविण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेला ग्रामस्थांनी दिलेल्या प्रतिसादाचे ठाणेदारांनी कौतुक केले आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्यातून सामाजिक एकोपा, शांतता, शिस्त आणि बंधुभावाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

गावागावांत ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहता, गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि एकतेची नवी परंपरा रुजत असल्याचे चित्र चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिसून येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top