Mahabreaking

[breaking_news]

Complete ban on DJs : बोरगाव मंजूत गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीवर पूर्णपणे बंदी; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

Complete ban on DJs : गेल्या दहा दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात उत्साहात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. बोरगाव मंजू शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने मुख्य मार्गावरून नगरप्रदक्षिणा करत गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बोरगाव मंजू पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.

ban

  १२ गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; ड्रोन, सीसीटीव्ही आणि वॉच टॉवरची नजर

संजय तायडे 

बोरगाव मंजू : गेल्या दहा दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात उत्साहात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. बोरगाव मंजू शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने मुख्य मार्गावरून नगरप्रदक्षिणा करत गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बोरगाव मंजू पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.

न्यायालयाच्या निर्देशानुसार गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे, डॉल्बी प्लाझासह मोठ्या आवाजाची वाद्ययंत्रणा वापरण्यास पूर्णपणे बंदी आहे. त्यामुळे गणेश मंडळे आणि डीजे चालकांनी न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बोरगाव मंजूचे ठाणेदार सुनील वानखडे यांनी केले आहे.

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर तसेच डीजे चालकांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.

१२ सार्वजनिक गणेश मंडळांचा सहभाग

बोरगाव मंजू शहरातील एकूण १२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने मुख्य मार्गावरून नगरप्रदक्षिणा करत विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. यासोबतच ग्रामीण भागातील गणेश मंडळांचाही विसर्जन मिरवणुकीत सहभाग राहणार आहे. काही गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेतून गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे.

विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी बोरगाव मंजू पोलिस प्रशासनाच्या वतीने आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश विसर्जन बंदोबस्तासाठी स्थानिक पोलिस दलासोबतच अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्र, राज्य राखीव पोलिस दलाच्या कंपन्या आणि होमगार्ड्स तैनात करण्यात आले आहेत. संवेदनशील व महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ड्रोन, सीसीटीव्ही आणि वॉच टॉवरद्वारे नजर

विसर्जन मिरवणुकीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे. बोरगाव मंजू शहरातील १२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणूक मार्गावर ड्रोन कॅमेरे आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारे हालचाली टिपण्यात येणार आहेत. तसेच महत्त्वाच्या ठिकाणी वॉच टॉवर उभारून पोलिसांकडून थेट देखरेख ठेवण्यात येणार आहे.

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होत नाही ना, याची तपासणी करण्यासाठी २१ नॉईज लेव्हल मीटर वापरण्यात येणार आहेत. तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी ब्रेथ अनालायझरचा वापर केला जाणार आहे.

सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

गणेश विसर्जनाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. सराईत गुन्हेगारांवर यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, संबंधितांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून गणेश विसर्जन शांततेत पार पाडावे, असे आवाहन ठाणेदार सुनील वानखडे यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top