lumpy disease : परिसरात गुरांना लंपी त्वचारोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या आजारामुळे शेतकरी संतोष शिगोंकार यांचा तब्बल पन्नास हजार रुपये किंमतीचा गोरा दगावला आहे. दुर्दैवाने या गंभीर परिस्थितीकडे पशुवैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, शेतकरी हैराण
तळेगाव बाजार : परिसरात गुरांना लंपी त्वचारोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या आजारामुळे शेतकरी संतोष शिगोंकार यांचा तब्बल पन्नास हजार रुपये किंमतीचा गोरा दगावला आहे. दुर्दैवाने या गंभीर परिस्थितीकडे पशुवैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.
आधीच अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा रोग डबल मारक ठरत आहे. जोडधंदा म्हणून शेतकरी गाई, म्हशी, बैल व शेळ्या पाळतात; मात्र गेल्या महिन्याभरापासून गुरांना लंपीची लागण होत असून वेळेवर उपचार न मिळाल्याने गुरे दगावत आहेत.
तळेगाव येथील शेतकरी राहुल इंगळे यांच्या बैल व गाईला लंपीची लागण झाली. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचारासाठी बोलावले असता, “औषध वरून येत नाही, शेतकऱ्यांनी स्वतः आणावे लागते, त्यामुळे खर्चासाठी पैसे घ्यावे लागतात” असे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.दरम्यान, शेतकरी संघटनांनी प्रशासनाने या गंभीर आजाराकडे तातडीने लक्ष द्यावे, मोफत उपचार व औषधे उपलब्ध करून द्यावीत आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
“गावोगावी जाऊन गुरांवर उपचार केले जात आहेत. काही औषधे किंवा इंजेक्शन उपलब्ध नसल्यास ती बाहेरून आणावी लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांकडून औषधाचा खर्च घेतला जातो.”दीपक उकाळे, पशुवैद्यकीय अधिकारी, तेल्हारा

