Ravana effigy: विदर्भात सांस्कृतिक आणि पौराणिक वारसा जोपासणारा दसरा उत्सव पातूर येथे मोठ्या उत्साहात साजरा होतो. यंदाही पातूर येथील श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने तब्बल ३१ फूट उंचीच्या रावण दहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेची परंपरा कायम
पातूर : विदर्भात सांस्कृतिक आणि पौराणिक वारसा जोपासणारा दसरा उत्सव पातूर येथे मोठ्या उत्साहात साजरा होतो. यंदाही पातूर येथील श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने तब्बल ३१ फूट उंचीच्या रावण दहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा अखंडितपणे चालू असून, पातूरकरांसाठी हा उत्सव अभिमानाचा विषय ठरला आहे.
हा भव्य सोहळा येथील दसरा भूमी मैदानावर पार पडणार असून, सामाजिक प्रतिष्ठित व्यक्ती, सर्वपक्षीय राजकीय नेते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत रावण दहन होणार आहे. २७ सप्टेंबर २०२५ रोजी भर पावसात मैदानाची पाहणी श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी केली. या पाहणीदरम्यान चंदू वस्ताद वानखडे व व्यायाम शाळेचे मार्गदर्शक भोजू पहेलवान यांच्या मार्गदर्शनाखाली तयारीचा आढावा घेण्यात आला. या वेळी उपस्थितांमध्ये अध्यक्ष राजू उगले, शेषराव फुलारी, डॉ. दिगंबर खुरसडे, विजय काळपांडे, संजय सौंदळे, वासुदेव गाडगे, काशीराम उगले, ज्ञानदेव गाडगे, शंकरराव बोचरे, गणेश गाडगे, गोपाल गाडगे, विठ्ठल लोथे, दीपक डोंगे, बंडू पाटील, बळीराम बंड, राजू हाळके, राजू आवटे, गणेश इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पावसाचे आव्हान असूनही तयारीला जोर देण्यात आला आहे. पातूरकरांसाठी रावण दहन उत्सव ही केवळ परंपरा नसून एक सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक सोहळा असल्याचे आयोजकांनी सांगितले. यावर्षीचा रावण दहन सोहळा अधिक भव्यदिव्य करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष प्रयत्नशील आहेत. त्यामुळे पातूरकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

