Mahabreaking

[breaking_news]

Project Sanjeevani :महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी बुलढाणा पोलिसांचा ‘प्रोजेक्ट संजीवनी’; विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

Project Sanjeevani : समाजातील प्रत्येक महिलेला निर्भय जीवन जगण्याचा, तर प्रत्येक बालकाला सुरक्षित बालपणाचा अधिकार आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने महिला व बालकांच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी ‘प्रोजेक्ट संजीवनी’ हा संवेदनशील आणि लोकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या हस्ते बुधवारी, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिरात या प्रकल्पाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.

Project

 गुड टच-बॅड टचपासून सायबर सुरक्षेपर्यंत जनजागृती; १२०० विद्यार्थिनींच्या उपस्थितीत ‘प्रोजेक्ट संजीवनी’चा प्रारंभ

बुलढाणा : समाजातील प्रत्येक महिलेला निर्भय जीवन जगण्याचा, तर प्रत्येक बालकाला सुरक्षित बालपणाचा अधिकार आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने महिला व बालकांच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी ‘प्रोजेक्ट संजीवनी’ हा संवेदनशील आणि लोकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या हस्ते बुधवारी, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिरात या प्रकल्पाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.

Project

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिला व बालकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, संकटग्रस्तांना समुपदेशन व मानसिक आधार देणे, कायदेशीर हक्कांविषयी जनजागृती करणे आणि संभाव्य गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे हा आहे. जिल्ह्यातील सर्व पाच पोलीस उपविभागांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Project

मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकल्पाचा शुभारंभ

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील होते, तर जिल्हाधिकारी प्रविण देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. सुकेश झंवर, चेअरमन, बुलढाणा को-ऑपरेटिव्ह सोसायटी, अॅड. प्रविण खांडपासळे, संचालक, दिशा संस्था, अमरावती आणि डॉ. सतीश जाधव, बुलढाणा हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी ‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आणि महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच पोलीस आणि समाज यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.

समुपदेशनापासून कायदेशीर मार्गदर्शनापर्यंत सात प्रमुख बाबींवर भर

‘प्रोजेक्ट संजीवनी’अंतर्गत महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी सात प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

१. समुपदेशन आणि मानसिक आधार : कौटुंबिक कलह, मानसिक तणाव, सामाजिक दबाव किंवा अन्य समस्यांमुळे असुरक्षित वाटणाऱ्या महिला व बालकांना योग्य मार्गदर्शन आणि मानसिक आधार देण्यात येणार आहे. त्यांच्या समस्या संवेदनशीलतेने समजून घेऊन विश्वासाचे वातावरण निर्माण करणे, आवश्यक मदत उपलब्ध करून देणे आणि कायदेशीर मार्गदर्शन करणे यावर भर राहणार आहे.

२. शालेय जनजागृती आणि कायदेशीर मार्गदर्शन : शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘पोलीस काका’ आणि ‘पोलीस दीदी’ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण केली जाणार आहे. गुड टच-बॅड टच, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, सायबर सुरक्षा, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर आणि संकटाच्या वेळी मदत कशी मिळवावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

३. बालविवाह प्रतिबंध : बालविवाह रोखण्यासाठी पालक, शिक्षक, ग्रामस्थ आणि समाजातील विविध घटकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून तातडीने कार्यवाही करण्यावर प्रकल्पात विशेष भर देण्यात आला आहे.

४. दामिनी पथकाची सतर्क गस्त : शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, बसस्थानके आणि महिलांची वर्दळ असलेल्या ठिकाणी दामिनी पथकांकडून नियमित गस्त घालण्यात येणार आहे. छेडछाड, पाठलाग आणि गैरवर्तन यांसारख्या प्रकारांना प्रतिबंध घालणे, तसेच संबंधित प्रकरणांमध्ये कायदेशीर कार्यवाही करणे हे या पथकाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

५. डायल-११२ सेवेबाबत जनजागृती : आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची मदत मिळवून देणाऱ्या डायल-११२ या सेवेबाबत महिला व बालकांना जागरूक केले जाणार आहे. संकटाच्या वेळी मदत मागण्यास संकोच न करता या सेवेचा वापर करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

६. हरविलेल्या महिला व मुलींचा शोध : हरविलेल्या महिला व मुलींचा शोध घेण्यासाठी तांत्रिक साधने, तपास कौशल्य आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे.

७. महिलांविरोधी गुन्ह्यांना प्रतिबंध : जनजागृती, प्रभावी पोलीस गस्त, तक्रारींवर कायदेशीर कार्यवाही, समुपदेशन आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या माध्यमांतून महिलांविरोधी गुन्ह्यांना आळा घालण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. समाजात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करून महिलांना निर्भयपणे वावरण्यास प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे.

आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन पदकविजेत्या तुलीका जाधव ब्रँड अॅम्बेसेडर

बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन पदकविजेत्या कु. तुलीका सतीशचंद्र जाधव यांची ‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून महिला व बालकांच्या सुरक्षेचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कार्यक्रमादरम्यान शुभम गवई, रा. बुलढाणा यांच्या सहभागातून शिवरंजन नाट्य संस्था, बुलढाणा यांनी ‘प्रोजेक्ट संजीवनी’वर आधारित पथनाट्य सादर केले. पथनाट्याच्या माध्यमातून महिला व बालकांच्या सुरक्षेचा संदेश देण्यात आला.

निलेश तांबे यांचे प्रास्ताविक; अमोल गायकवाड यांचे आभार

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी केले.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, खामगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, खामगाव, सोहन माछरे, मलकापूर, विलास यामावार, बुलढाणा, अर्जुन ठोसरे, देऊळगाव राजा, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अमोल दिघोळे, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण अधिकारी प्रमोद इंडोले आणि महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे उपस्थित होते.

याशिवाय बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, शाखा प्रभारी अधिकारी, शिक्षकवृंद आणि शालेय व महाविद्यालयीन अशा सुमारे १२०० विद्यार्थिनी कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हा विशेष शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी विशेष प्रयत्न केले.

महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी केवळ कायदेशीर कारवाई पुरेशी नसून जनजागृती, समुपदेशन, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि समाजाचा सहभागही महत्त्वाचा आहे. या दृष्टिकोनातून ‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top