drought: खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य संबंधित घटकांचा विचार करून राज्यातील ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ लागू झालेल्या एकूण ३०४ तालुक्यांना अंतिमतः दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. या तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना आणि विविध सवलती लागू करण्यात येणार आहेत. तसेच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.

१२ सवलती लागू; पीक नुकसानभरपाई स्वतंत्र शासन निर्णयाने जाहीर होणार, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुके दुष्काळग्रस्त यादीत
गजानन तिडके
बुलढाणा : खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य संबंधित घटकांचा विचार करून राज्यातील ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ लागू झालेल्या एकूण ३०४ तालुक्यांना अंतिमतः दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. या तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना आणि विविध सवलती लागू करण्यात येणार आहेत. तसेच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.
मदत व पुनर्वसन विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. यापूर्वी ट्रिगर-१ लागू झालेल्या २६५ तालुक्यांना २६ सप्टेंबर २०२६ रोजी दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले होते. त्यानंतर ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ च्या आधारे आणखी ३९ तालुक्यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची एकूण संख्या ३०४ झाली आहे.
दुष्काळग्रस्त तालुक्यांना १२ उपाययोजना आणि सवलतींचा लाभ
दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने १२ विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने दुष्काळग्रस्त घोषित झालेल्या ३९ तालुक्यांनाही या उपाययोजनांचा लाभ मिळणार आहे.
यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी यांचा समावेश आहे.
याशिवाय रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे अधिक प्रमाणात सुरू करण्यासाठी निकषांमध्ये शिथिलता आणणे, आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, टंचाई जाहीर केलेल्या गावांतील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीजजोडणी खंडित न करणे, शेतकरी व शेतमजुरांसाठी अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करणे, अशा उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
जलसंधारणाची कामे सुरू करणे, पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जाणार आहे.
पीक नुकसानभरपाईसाठी स्वतंत्र शासन निर्णय
दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या सर्व ३०४ तालुक्यांमध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि जीपीएस निर्देशांक संकलित करून पिकांच्या परिस्थितीचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. हा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाकडे तातडीने सादर केला जाणार आहे.
पिकांच्या नुकसानीबाबत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत विहित कार्यपद्धती पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त तालुके घोषित झाल्यानंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष पंचनाम्यांची प्रक्रिया, नुकसानीचे मूल्यांकन आणि प्रत्यक्ष आर्थिक मदतीच्या घोषणेकडे लागले आहे.
दुष्काळग्रस्त भागातील पाणीटंचाई, चारा, रोजगार आणि शेतीशी संबंधित अडचणी सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यावर शासन भर देणार असल्याचे मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुके दुष्काळग्रस्त
जाहीर करण्यात आलेल्या यादीत बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, बुलढाणा, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा आणि नांदुरा या सर्व १३ तालुक्यांचा समावेश आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर आणि बार्शीटाकळी या सात तालुक्यांनाही दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या सहा तालुक्यांचा समावेश आहे.
विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातील १४, यवतमाळमधील १६, वर्धामधील आठ, नागपूरमधील १४, भंडाऱ्यातील पाच, गोंदियातील आठ, चंद्रपूरमधील १५ आणि गडचिरोलीतील दोन तालुके दुष्काळग्रस्त यादीत आहेत.
राज्यातील जिल्हानिहाय दुष्काळग्रस्त तालुके
शासनाने जाहीर केलेल्या यादीतील जिल्हानिहाय तालुके पुढीलप्रमाणे आहेत.
बुलढाणा (१३): जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, बुलढाणा, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा.
- अमरावती (१४): अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरूड, मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर.
- अकोला (७): अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी.
- वाशिम (६): वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा.
- यवतमाळ (१६): यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव.
- वर्धा (८): वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी, कारंजा.
- नागपूर (१४): नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर.
- भंडारा (५): भंडारा, पवनी, लाखांदूर, मोहाडी, तुमसर.
- गोंदिया (८): तिरोडा, आमगाव, देवरी, सालेकसा, गोंदिया, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, गोरेगाव.
- चंद्रपूर (१५): चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही, पोंभुर्णा, जिवती, ब्रह्मपुरी, बल्लारपूर.
- गडचिरोली (२): गडचिरोली, चामोर्शी.
- पालघर (३): जव्हार, मोखाडा, तलासरी.
- रायगड (१): श्रीवर्धन.
- रत्नागिरी (६): रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर, लांजा, मंडणगड, खेड.
- सिंधुदुर्ग (८): सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला.
- नाशिक (१३): मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा, त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड.
- धुळे (४): धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर.
- जळगाव (१५): एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल.
- नंदुरबार (६): अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा, अक्राणी.
- अहिल्यानगर (१४): अहिल्यानगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, रहाता.
- पुणे (१०): भोर, वेल्हे, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, आंबेगाव, जुन्नर.
- सोलापूर (११): उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा.
- सांगली (१०): मिरज, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, शिराळा, वाळवा, खानापूर, तासगाव, कडेगाव, पलूस.
- सातारा (११): सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई, कोरेगाव, कराड.
- कोल्हापूर (८): पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड, शाहूवाडी, शिरोळ.
- छत्रपती संभाजीनगर (९): छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री.
- जालना (८): बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद.
- बीड (११): बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी.
- लातूर (१०): लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट.
- धाराशिव (८): धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परंडा, उमरगा.
- नांदेड (१६): नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव, मुदखेड, मुखेड.
- परभणी (९): पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी.
- हिंगोली (५): हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

