Brawl at roadside :शहरातील जालना रोडवरील बापुचा ढाबा येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीवर शिवीगाळ, मारहाण करून जखमी करणे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

“आमच्या बोलण्यात पडू नको” म्हणत मारहाण; देऊळगाव राजात युवक जखमी
गजानन तिडके
देऊळगाव राजा : शहरातील जालना रोडवरील बापुचा ढाबा येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीवर शिवीगाळ, मारहाण करून जखमी करणे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुनाथ शंकर निकाळजे (वय 36, रा. पिंपळनेर, ता. देऊळगाव राजा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. तर सचिन वाढेकर (रा. सावखेड भोई, ता. देऊळगाव राजा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, 20 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास रघुनाथ निकाळजे हे जालना रोडवरील बापुचा ढाबा येथे भाजीचे पार्सल घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी ढाब्यासमोर आरोपी सचिन वाढेकर आणि त्याचा मित्र ढोले हे दोघे उभे राहून चर्चा करीत होते. यावेळी निकाळजे यांनी ढोले याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केल्याने आरोपी संतप्त झाला.
“आम्ही दोघे बोलत आहोत, आमच्या बोलण्यात तुझे काही काम नाही,” असे म्हणत आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीदरम्यान जवळच पडलेला विटेचा तुकडा उचलून फिर्यादीच्या डाव्या कानावर फेकून मारला. तसेच डोक्याच्या मागील बाजूसही विटेने मारहाण केल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. या हल्ल्यात फिर्यादीच्या कानाला व डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तोंडी अहवाल व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अप. क्र. 282/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 118(1), 352, 351(2) व 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय गोरे करीत असून, पुढील तपास देऊळगाव राजा पोलिसांकडून सुरू आहे. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

