Mahabreaking

[breaking_news]

Signs of the El Niño :एल निनोच्या संकटाची चाहूल; खरीप हंगामासाठी कृषी विभागाचे शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

Signs of the El Niño : यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचे सावट असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपासून पीक व्यवस्थापनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. भारतीय हवामान विभागाने २०२६-२७ या वर्षात एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता व्यक्त केल्याने मान्सून उशिरा येणे, पावसाचे अनियमित वितरण, दीर्घ कोरडे कालखंड आणि तापमानवाढ यांसारख्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.

Signs of the El Niño

पेरणीची घाई टाळा, वैज्ञानिक नियोजन करा; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला

संजय तायडे 

अकोला : यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचे सावट असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपासून पीक व्यवस्थापनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. भारतीय हवामान विभागाने २०२६-२७ या वर्षात एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता व्यक्त केल्याने मान्सून उशिरा येणे, पावसाचे अनियमित वितरण, दीर्घ कोरडे कालखंड आणि तापमानवाढ यांसारख्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.

add

अकोला तालुक्यात यंदा खरीप हंगामात सुमारे ९१ हजार ३६८ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून त्यामध्ये ४१ हजार हेक्टर कापूस, ३८ हजार ५०० हेक्टर सोयाबीन आणि १० हजार ५० हेक्टर तूर लागवडीचे लक्ष्य आहे. मात्र बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीऐवजी जोखीम कमी करणाऱ्या आधुनिक कृषी तंत्रांचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीची घाई टाळण्याचा सल्ला दिला आहे. किमान ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर आणि जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी, असे सांगण्यात आले आहे. धूळपेरणी अथवा एक-दोन सरींच्या आधारावर पेरणी केल्यास नुकसान होण्याची शक्यता असल्याचेही विभागाने नमूद केले आहे.

एल निनोच्या पार्श्वभूमीवर बहुपीक व आंतरपीक पद्धतीचा अवलंब, बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी, जैविक बीजप्रक्रिया, जलसंधारण उपाययोजना आणि संतुलित खत व्यवस्थापनावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पावसात विलंब झाल्यास कमी कालावधीत येणाऱ्या व दुष्काळ सहनशील वाणांची निवड करण्याचा सल्ला तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांनी दिला आहे.

सोयाबीनसाठी पीडीकेव्ही आंबा, पीडीकेव्ही येलो गोल्ड, जेएस-३३५, जेएस-९३०५, एमएयुएस-६१२ व एमएयुएस-१५८ या वाणांची, तर तुरीसाठी पीकेव्ही तारा, बीडीएन-७१६, रेणुका आणि गोदावरी या वाणांची शिफारस करण्यात आली आहे.

add

दरम्यान, तालुका कृषी आत्मा समितीचे अध्यक्ष जयकृष्ण ठोकळ यांनी शेतकऱ्यांना दिलासा देताना खरीप हंगामासाठी आवश्यक खते व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगितले. विक्रेत्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करणे, सक्तीची विक्री करणे किंवा जादा दर आकारणे असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण यंत्रणाही कार्यान्वित केली असून तांत्रिक मार्गदर्शनासाठी तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष तसेच किसान कॉल सेंटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top