Mahabreaking

[breaking_news]

Before Diwali :दिवाळीपूर्वीच ४ लाख ३० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची मदत जमा!

Before Diwali : यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने राज्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला. अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रिम मदत देण्याचा निर्णय घेतला होता.

Before Diwali

बुलढाण्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; २१५ कोटींचे अर्थसाहाय्य खात्यात

गजानन तिडके

बुलढाणा : यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने राज्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला. अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रिम मदत देण्याचा निर्णय घेतला होता.

या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करत शासनाने दिवाळीपूर्वीच बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ३० हजार १५३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत २१५ कोटी ८ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य जमा केले आहे. ऐन सणासुदीच्या काळात मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारीनुसार, चिखली तालुक्यात सर्वाधिक ५२ हजार ९६९ शेतकऱ्यांना २६ कोटी ४८ लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. त्याखालोखाल मेहकर तालुक्यातील ४७ हजार ७३२ शेतकऱ्यांना २३ कोटी ८७ लाख रुपये, सिंदखेड राजा तालुक्यातील ४२ हजार ७८ शेतकऱ्यांना २१ कोटी ४ लाख रुपये, खामगाव तालुक्यातील ४० हजार २६ शेतकऱ्यांना २० कोटी १ लाख रुपये, तर बुलढाणा तालुक्यातील ३६ हजार ३३ शेतकऱ्यांना १८ कोटी २ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे लोणार तालुक्यातील ३४ हजार ३८ शेतकऱ्यांना १७ कोटी २ लाख रुपये, मोताळा तालुक्यातील ३१ हजार ८१९ शेतकऱ्यांना १५ कोटी ९१ लाख रुपये, नांदुरा तालुक्यातील २७ हजार ३८८ शेतकऱ्यांना १३ कोटी ६९ लाख रुपये, तर संग्रामपूर तालुक्यातील २५ हजार ८५७ शेतकऱ्यांना १२ कोटी ९३ लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील २४ हजार ७४८ शेतकऱ्यांना १२ कोटी ३७ लाख रुपये, मलकापूर तालुक्यातील २२ हजार ७५५ शेतकऱ्यांना ११ कोटी ३८ लाख रुपये, शेगाव तालुक्यातील २२ हजार ११७ शेतकऱ्यांना ११ कोटी ६ लाख रुपये, तर जळगाव जामोद तालुक्यातील २२ हजार ५९३ शेतकऱ्यांच्या खात्यांत ११ कोटी ३० लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे.

अशा प्रकारे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांतील एकूण ४ लाख ३० हजार १५३ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत २१५ कोटी ८ लाख रुपयांची अग्रिम मदत जमा करण्यात आली आहे. कमी पावसामुळे खरीप हंगामात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली ही मदत शेतकऱ्यांसाठी अडचणीच्या काळातील मोठा आर्थिक आधार ठरली आहे.

दिवाळीपूर्वीच मदतीची रक्कम खात्यात जमा झाल्याने शेतकऱ्यांना सणासुदीचा खर्च, दैनंदिन गरजा तसेच शेतीशी संबंधित खर्च भागविण्यासाठी आर्थिक हातभार मिळाला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना दिवाळीच्या सणात काहीसा दिलासा मिळाला आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top