solar project : मेहकर तालुक्यातील कन्हाळवाडी येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत उभारण्यात येत असलेला ६ मेगावाट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प अखेर बालदिनाच्या मुहूर्तावर कार्यान्वित झाला आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय दिरंगाईमुळे रखडलेल्या या प्रकल्पाला गती मिळावी, यासाठी माजी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती राजेंद्र पळसकर यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्याच्या आनंदात शेतकरी व कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

राजेंद्र पळसकरांचा आंदोलनाचा इशारा ठरला निर्णायक; कन्हाळवाडीचा सौर प्रकल्प अखेर कार्यान्वित!
डोणगाव : मेहकर तालुक्यातील कन्हाळवाडी येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत उभारण्यात येत असलेला ६ मेगावाट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प अखेर बालदिनाच्या मुहूर्तावर कार्यान्वित झाला आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय दिरंगाईमुळे रखडलेल्या या प्रकल्पाला गती मिळावी, यासाठी माजी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती राजेंद्र पळसकर यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्याच्या आनंदात शेतकरी व कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
कन्हाळवाडी येथे सुमारे २७ एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे डोणगाव, पांगरखेड आणि मादणी परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, प्रशासकीय दिरंगाई आणि विविध अडचणींमुळे गेल्या चार वर्षांपासून या प्रकल्पाचे काम रखडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याची प्रतीक्षा करावी लागत होती.
प्रकल्पाच्या कामाला गती मिळावी, यासाठी राजेंद्र पळसकर यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, कामात अपेक्षित प्रगती होत नसल्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आणि ३ नोव्हेंबर रोजी प्रकल्पाच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली. अवघ्या काही दिवसांत प्रकल्प कार्यान्वित झाल्याने शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
सध्या तूर पिकाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वीजपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत होते. रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच पाण्याचाही अपव्यय होत होता. आता सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होण्यास मदत होणार असून, रात्रीचे जागरण कमी होण्यासोबतच पाण्याचीही बचत होणार आहे.
चार वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाचे स्वप्न अखेर साकार झाल्याने डोणगाव, पांगरखेड आणि मादणी परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. राजेंद्र पळसकर यांच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्प मार्गी लागल्याच्या आनंदात स्थानिक शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला.

