Kishor Wagh : शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या क्षेत्रात एकाग्रता व स्मरणशक्ती वाढविण्याच्या नावाखाली सुपर सेन्सरी मेमरी, थर्ड आय, मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन, इंट्यूशन प्रोसेस, मेधा योगा आणि सिक्रेट फास्ट रीडिंग यांसारख्या विविध प्रकारच्या भोंदूगिरीद्वारे फसवणूक केली जात आहे. अशा भूलथापांना विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी बळी पडू नये, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मराठवाडा प्रमुख तथा मानसशास्त्रज्ञ किशोर वाघ यांनी केले.

‘थर्ड आय’, ‘मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन’च्या भूलथापांना बळी पडू नका; विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचा इशारा
खामगाव : शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या क्षेत्रात एकाग्रता व स्मरणशक्ती वाढविण्याच्या नावाखाली सुपर सेन्सरी मेमरी, थर्ड आय, मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन, इंट्यूशन प्रोसेस, मेधा योगा आणि सिक्रेट फास्ट रीडिंग यांसारख्या विविध प्रकारच्या भोंदूगिरीद्वारे फसवणूक केली जात आहे. अशा भूलथापांना विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी बळी पडू नये, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मराठवाडा प्रमुख तथा मानसशास्त्रज्ञ किशोर वाघ यांनी केले.
स्थानिक नॅशनल हायस्कूलमध्ये शिक्षक प्रशिक्षणादरम्यान ‘शैक्षणिक क्षेत्रातील अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर किशोर वाघ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी स्मरणशक्ती आणि मिड ब्रेन ॲक्टिव्हेशनसंदर्भात विविध प्रात्यक्षिकांसह उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी गजानन गायकवाड होते, तर तज्ज्ञ मार्गदर्शक सतीश कोलते आणि प्रा. अनिल हिरळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेमरी ट्रेनर किशोर वाघ यांनी स्मरणशक्तीची काही आश्चर्यकारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यानंतर त्यांनी स्मरणशक्तीचे वैज्ञानिक नियम, तिची वैशिष्ट्ये, मनाची शक्ती आणि एकाग्रता वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
प्रश्नोत्तराच्या सत्रात त्यांनी विविध विषयांवर उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. तसेच खरे संत आणि समाजसुधारक यांच्या कार्याचा दाखला देत संतवचनांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्व पटवून दिले. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय बोरकर यांनी केले. प्रदीपकुमार सातव यांनी सूत्रसंचालन केले, तर विनोद नखाते यांनी आभार मानले.

