A cash reward : जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुरा खुर्द शिवारात एका अज्ञात महिलेचा शिरच्छेद केलेला व अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने चुकीच्या पध्दतीने तपास केला होता. त्यामुळे, बुलढाणा पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता पुन्हा पोलिसांनी नव्याने तपास सुरू केला असून त्या महिलेविषयी माहिती देणाऱ्यास ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

पोलिसांनी तपास केला सुरू : चुकीच्या तपासानंतर महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान
बुलढाणा : जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुरा खुर्द शिवारात एका अज्ञात महिलेचा शिरच्छेद केलेला व अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने चुकीच्या पध्दतीने तपास केला होता. त्यामुळे, बुलढाणा पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता पुन्हा पोलिसांनी नव्याने तपास सुरू केला असून त्या महिलेविषयी माहिती देणाऱ्यास ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राजुरा खुर्द शिवारातील आसीफ हमीद मुल्लाजी यांच्या शेतालगत निंबाच्या झाडाजवळ नदीकाठी हा मृतदेह आढळून आला. महिलेचा खून करून तिची ओळख पटू नये, या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मृत महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून उंची सुमारे ५ ते ५.३ फूट आहे. शरीरयष्टी मध्यम, रंग सावळा आणि केस काळे आहेत. तिच्या अंगावर हिरव्या रंगाचा टॉप, काळ्या पट्ट्यांची कथई रंगाची पॅन्ट, निळ्या रंगाची ब्रा आणि गुलाबी रंगाच्या सँडल आढळून आल्या आहेत. तसेच उजव्या हातात काळा धागा, डाव्या हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि गळ्यात काळ्या मण्यांची पांढऱ्या धातूची पोत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या महिलेची ओळख पटविण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे. वरील वर्णनाशी मिळतीजुळती महिला बेपत्ता असल्यास, अथवा तिच्याबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मृत महिलेची ओळख पटविण्यास अथवा तपासासाठी उपयुक्त माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल. तसेच माहिती देणाऱ्यास ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने जाहीर केले आहे. या महिलेविषयी माहिती असल्यास पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक तसेच तपास अधिकारी तथा मेहकर एसडीपीओ, जळगाव जामोद ठाणेदार यांच्या संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

