Large trees : बुलढाणा तालुक्यातील मासरूळ येथील पद्मावती धरणाच्या सांडव्यात मोठमोठी झाडे-झुडपे वाढली असून मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असतानाही संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पावसाळ्यात धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्यास सांडव्यातील झाडे आणि गाळामुळे अतिरिक्त पाण्याचा विसर्ग प्रभावित होण्याची शक्यता असल्याने तातडीने साफसफाई करण्याची मागणी होत आहे.

पद्मावती धरणाच्या सांडव्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष; झाडे-गाळामुळे धोका वाढला
पंडित सावळे
मासरूळ : बुलढाणा तालुक्यातील मासरूळ येथील पद्मावती धरणाच्या सांडव्यात मोठमोठी झाडे-झुडपे वाढली असून मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असतानाही संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पावसाळ्यात धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्यास सांडव्यातील झाडे आणि गाळामुळे अतिरिक्त पाण्याचा विसर्ग प्रभावित होण्याची शक्यता असल्याने तातडीने साफसफाई करण्याची मागणी होत आहे.
धरणातील अतिरिक्त पाणी सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सांडवा हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. मात्र, सांडव्यातच मोठमोठी झाडे-झुडपे वाढल्याने तसेच गाळ साचल्याने पाण्याचा प्रवाह अडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात धरणातील पाण्याची पातळी वाढल्यास त्याचा परिणाम धरणाच्या संरचनेवर होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
सांडव्यात वाढलेल्या झाडांच्या मुळांमुळे काँक्रिट किंवा दगडी बांधकामाला तडे जाण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे सांडव्यातील अडथळ्यांमुळे पाण्याचा विसर्ग सुरळीत न झाल्यास धरणावर अतिरिक्त पाण्याचा दाब निर्माण होऊ शकतो. परिणामी धरणालगतच्या शेतीसह मासरूळ, धामणगाव टाकळी व डोमरूळ या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
मान्सूनपूर्व देखभाल करण्याची मागणी
लघुपाटबंधारे विभागाने सांडव्यातील झाडे केवळ वरून छाटण्याऐवजी ती मुळासकट काढावीत, तसेच साचलेला गाळ तातडीने हटवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. झाडांच्या मुळांमुळे सांडवा किंवा त्याच्या बांधकामाचे नुकसान झाले आहे का, याची तांत्रिक तपासणी करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.
झाडे काढल्यानंतर बांधकामात भेगा किंवा फटी आढळल्यास त्यांची तातडीने डागडुजी करून आवश्यक ठिकाणी सिमेंट ग्राउटिंग करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सांडव्याची पाहणी, स्वच्छता आणि आवश्यक दुरुस्ती करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनीला धोका
माजी सरपंच तथा शेतकरी शेषराव किसन सावळे यांनी सांगितले की, पद्मावती धरणाच्या सांडव्याला लागून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. सांडव्यात मोठ्या प्रमाणात झाडे वाढल्याने व पाण्याचा प्रवाह बाधित झाल्यास या शेतजमिनींना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने परिस्थिती गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
‘झाडे तातडीने हटविणार’
महावीर मुरकुटे, कनिष्ठ अभियंता, लघुपाटबंधारे विभाग यांनी सांगितले की, पद्मावती धरणाचा सांडवा हा पुराचे अतिरिक्त पाणी सुरक्षितपणे वाहून नेण्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. सांडवा किंवा त्याच्या भिंतींच्या फटीत झाडे-झुडपे वाढल्यास त्यांच्या मुळांमुळे काँक्रिट व दगडी बांधकामाला नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून सांडव्यातील झाडे हटविण्याची कार्यवाही लवकरच हाती घेण्यात येईल.
दरम्यान, पद्मावती धरणाच्या सांडव्याची तातडीने पाहणी करून झाडे, झुडपे व गाळ हटविण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी मासरूळसह परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.

