incinerate and destroy drugs : अकोला जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एनडीपीएस ॲक्ट 1985 अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थांचा मुद्देमाल न्यायालयीन परवानगी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जाळून नष्ट करण्यात आला. या कारवाईत 56 गुन्ह्यांतील 246 किलो 900 ग्रॅम वजनाचा, 1 कोटी 75 लाख 86 हजार 247 रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

NDPS कारवाईला वेग; अकोल्यात 246 किलो 900 ग्रॅम अंमली पदार्थांची विल्हेवाट
अकोला : अकोला जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एनडीपीएस ॲक्ट 1985 अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थांचा मुद्देमाल न्यायालयीन परवानगी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जाळून नष्ट करण्यात आला. या कारवाईत 56 गुन्ह्यांतील 246 किलो 900 ग्रॅम वजनाचा, 1 कोटी 75 लाख 86 हजार 247 रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

अकोला जिल्हा पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एनडीपीएस ॲक्ट 1985 अन्वये गुन्हे दाखल करून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये गांजा, एमडी ड्रग्ज, मॉर्फिन आदींचा समावेश होता. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशा मुद्देमालाची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी पोलीस मुख्यालय, अकोला येथे केंद्रीय अंमली पदार्थ गोदाम तयार करण्यात आले असून, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील जप्त अंमली पदार्थांचा मुद्देमाल या गोदामात जमा करण्यात येतो.

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी प्रलंबित अंमली पदार्थ मुद्देमालाचा आढावा घेऊन त्याची विल्हेवाट लावण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस मुख्यालय, अकोला येथील अंमली पदार्थ गोदामात जमा करण्यात आलेल्या विविध पोलीस ठाण्यांतील 56 गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेऊन प्रक्रिया सुरू करण्यात आली.
या मुद्देमालाच्या विल्हेवाटीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांची परवानगी घेण्यात आली. तसेच Chief Controller, Government Opium and Alkaloid Factories, Delhi यांचीही आवश्यक मंजुरी प्राप्त करण्यात आली. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दि. 30 जून 2026 रोजी महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड, बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र, मौजा मांडवा, जि. नागपूर येथे हा मुद्देमाल रोटरी इन्सिनरेटरमध्ये जाळून नष्ट करण्यात आला.
या वेळी ड्रग डिस्पोजल कमिटीचे सदस्य तथा अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) तथा समिती सदस्य पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा नोडल अधिकारी नितीन लेव्हरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल जाधव, दोन शासकीय पंच, व्हिडिओग्राफर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अकोलाचे उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेडचे युनिट हेड प्रशांत मस्के, कंपनीचे कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
यामध्ये पोलीस हवालदार विलास बंकावार , संदीप तवाडे , सुनील काळे , पोलीस कॉन्स्टेबल उदय शुक्ला आणि स्वप्नील चौधरी यांचाही सहभाग होता. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंपनीकडून मुद्देमाल नष्ट केल्याचे प्रमाणपत्रही प्राप्त करण्यात आले.

