Achieved economic progress : माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै रोजी बुलढाणा येथे कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अग्रगण्य शेतकरी महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सिंदखेडराजा तालुक्यातील आंबेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी महिला सौ. सुनिता भानुदास आव्हाड यांना ‘राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतिशील महिला शेतकरी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

फुलशेतीत यशस्वी भरारी; आंबेवाडीच्या महिला शेतकऱ्याला कृषी विभागाचा सन्मान
साखरखेर्डा : माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै रोजी बुलढाणा येथे कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अग्रगण्य शेतकरी महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सिंदखेडराजा तालुक्यातील आंबेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी महिला सौ. सुनिता भानुदास आव्हाड यांना ‘राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतिशील महिला शेतकरी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
आंबेवाडी येथील शेतकरी भानुदास आव्हाड आणि त्यांच्या पत्नी सुनिता आव्हाड यांनी फुलशेतीत यशस्वी वाटचाल करत शेती व्यवसायात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. त्यांनी एक हेक्टर क्षेत्रावर गुलाबाची लागवड, तसेच २० गुंठे क्षेत्रात झेंडू आणि २० गुंठ्यांत इतर फुलपिकांची लागवड करून फुलशेतीचा आदर्श उभा केला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब आणि गुलाब पिकाच्या उत्पादनात घेतलेली भरारी यामुळे आव्हाड दाम्पत्याची शेती परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. विशेषतः गुलाब पिकाच्या लागवडीत सातत्य, दर्जा आणि नियोजनबद्ध व्यवस्थापन यामुळे त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कृषी विभागाच्या वतीने बुलढाणा येथे आयोजित कार्यक्रमात सुनिता आव्हाड यांना ‘राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतिशील महिला शेतकरी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, कृषी विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अमोल झाने, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक अशोक ठाकरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, मुख्य लेखाधिकारी प्रकाश राठोड, जिल्हा कृषी अधिकारी धीरज वाकोडे, कृषी अधिकारी पुरुषोत्तम अनगाईत तसेच मोहीम अधिकारी प्रमोद गायके यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते सुनिता आव्हाड यांना प्रशस्तीपत्र आणि रोख ३ हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे आंबेवाडी गावासह सिंदखेडराजा तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या या यशाबद्दल शेतकरी बांधवांकडून आणि परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

