special camps : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने विशेष पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील तब्बल ३० हजार ६५६ शेतकरी विविध तांत्रिक अडचणींमुळे अद्याप आधार प्रमाणीकरणापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ३ ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रत्येक तालुक्यात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपली प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.

फार्मर आयडी नसल्याने कर्जमाफी रखडली; बुलढाणा जिल्ह्यात तीन दिवस विशेष मोहीम
बुलढाणा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने विशेष पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील तब्बल ३० हजार ६५६ शेतकरी विविध तांत्रिक अडचणींमुळे अद्याप आधार प्रमाणीकरणापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ३ ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रत्येक तालुक्यात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपली प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शैलेंद्र कुमार सिंह, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण, तालुका सहाय्यक निबंधक तथा सहकार अधिकारी श्रेणी-१, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा समन्वयक तसेच सर्व राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, खासगी आणि सहकारी बँकांचे समन्वयक उपस्थित होते.
जिल्ह्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत १ लाख ९६ हजार ३३९ लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या आधार प्रमाणीकरणासाठी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १ लाख ६५ हजार ६८३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यापैकी १ लाख १४ हजार ८८४ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. मात्र, अद्याप ३० हजार ६५६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण विविध तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित आहे.
विशेष म्हणजे, आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांपैकी तब्बल १३ हजार ५५१ शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अद्याप तयार झालेले नाहीत. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण करताना फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. त्यामुळे फार्मर आयडीअभावी अनेक पात्र शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार ३, ४ आणि ५ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करणे, आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे तसेच कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविताना येणाऱ्या इतर तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यात येणार आहे.
कर्जमुक्तीच्या लाभासाठी पात्र असूनही केवळ तांत्रिक अडचणींमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची संधी आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान आयोजित विशेष शिबिरांमध्ये सहभागी होऊन फार्मर आयडी आणि आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. अधिक माहितीसाठी संबंधित तलाठ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.

