Maha Lab services : महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ‘आपला दवाखाना’ या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये महा लॅबच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या रक्तनमुना संकलन आणि प्रयोगशाळा तपासणी सेवा अचानक बंद झाल्याने ग्रामीण व शहरी भागातील गरीब आणि गरजू रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. HLL कंपनीची शासनाकडील मागील दोन वर्षांपासूनची देयके प्रलंबित असल्याने या अत्यावश्यक आरोग्य सेवा ठप्प झाल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी, सर्वसामान्य रुग्णांना खासगी प्रयोगशाळांचा आधार घ्यावा लागत असून त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड पडत आहे.

HLL ची दोन वर्षांची देयके थकीत; महा लॅब ठप्प, शासकीय आरोग्य सेवेचा बोजवारा!
डोणगाव : महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ‘आपला दवाखाना’ या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये महा लॅबच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या रक्तनमुना संकलन आणि प्रयोगशाळा तपासणी सेवा अचानक बंद झाल्याने ग्रामीण व शहरी भागातील गरीब आणि गरजू रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. HLL कंपनीची शासनाकडील मागील दोन वर्षांपासूनची देयके प्रलंबित असल्याने या अत्यावश्यक आरोग्य सेवा ठप्प झाल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी, सर्वसामान्य रुग्णांना खासगी प्रयोगशाळांचा आधार घ्यावा लागत असून त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड पडत आहे.
खासगी प्रयोगशाळांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
सध्या शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक विविध आर्थिक संकटांचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत आजारपणात आवश्यक असलेल्या रक्ततपासण्या आणि इतर प्रयोगशाळा तपासण्यांसाठी खासगी लॅबमध्ये मोठा खर्च करावा लागत आहे. शासकीय आरोग्य संस्थांमध्ये महा लॅबच्या माध्यमातून मोफत किंवा अल्प दरात उपलब्ध होणाऱ्या तपासण्या गरीब रुग्णांसाठी मोठा आधार ठरत होत्या. मात्र, या सेवा अचानक बंद झाल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
आमदार कार्यालयाकडे नागरिकांच्या तक्रारींचा ओघ
महा लॅबच्या सेवा बंद झाल्यामुळे रुग्णांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत नागरिकांकडून आमदार कार्यालयाशी सातत्याने संपर्क साधून नाराजी व्यक्त केली जात आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणीची सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी प्रयोगशाळांकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या कुटुंबांवर अतिरिक्त खर्चाचा भार पडत आहे. या अत्यावश्यक आरोग्य सेवा तातडीने पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
थकीत देयके अदा करून सेवा पूर्ववत करा
शासकीय आरोग्य संस्थांमधील प्रयोगशाळा सेवा बंद राहणे ही सर्वसामान्यांच्या आरोग्याशी निगडित गंभीर बाब आहे. त्यामुळे राज्य शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून HLL कंपनीची प्रलंबित देयके अदा करावीत. तसेच राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ‘आपला दवाखाना’ येथे महा लॅबच्या माध्यमातून रक्तनमुना संकलन व प्रयोगशाळा तपासणी सेवा तातडीने पूर्ववत सुरू कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

