Mahabreaking

[breaking_news]

Acute water shortage :चतारीत पाणीटंचाई तीव्र; पाण्यासाठी महिलांचे रात्रभर जागरण

Acute water shortage : पातूर तालुक्यातील चतारी गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी रात्री उशिरापर्यंत रांगा लावाव्या लागत आहेत. विशेषतः महिलांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी रात्रभर जागरण करावे लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Acute water shortage

‘हर घर जल’ योजनेचा बोजवारा? चतारीत पाण्यासाठी कॅनच्या रांगा

राहुल सोनोने

दिग्रस बू. : पातूर तालुक्यातील चतारी गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी रात्री उशिरापर्यंत रांगा लावाव्या लागत आहेत. विशेषतः महिलांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी रात्रभर जागरण करावे लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सुमारे चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या चतारी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडून लाखो रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती असली, तरी आजही ग्रामस्थांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

गावातील आरओ प्लँटमधून पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना कॅन घेऊन रांगा लावाव्या लागतात. सायंकाळी चार वाजल्यापासूनच पाण्यासाठी कॅन ठेवून क्रमांक लावले जातात. आरओ प्लँटमधून पाणीपुरवठा रात्री उशिरा सुरू होत असल्याने अनेकांना रात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, चतारी-सांगोळा मार्गावरील सरकारी विहिरीतून पूर्वी गावाला पाणीपुरवठा होत होता. मात्र, त्या पाईपलाईनला मागील महिन्याभरापासून गळती असून ती दुरुस्त करण्यात आलेली नाही. परिणामी गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

काही नागरिकांनी गावालगतच्या शेतातील खाजगी विहिरीतून नळजोडणी घेतली असून त्यासाठी दरमहा २०० रुपये मोजावे लागत आहेत. तर अनेक कुटुंबांना बैलगाडी किंवा अन्य साधनांच्या मदतीने पाणी आणावे लागत आहे.

आरओ प्लँटवर प्रत्येक कॅन भरण्यासाठी पाच रुपये आकारले जात असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. दिवसभर शेतमजुरी करून परतलेल्या महिलांना पुन्हा पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे.

दरम्यान, केंद्र शासनाची ‘हर घर नळ, हर घर जल’ योजना गावात प्रभावीपणे राबविली गेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने वरिष्ठ प्रशासनाने तातडीने दखल घेऊन गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top