Mahabreaking

[breaking_news]

Poor condition of Koyali-Lonar main road :कोयाळी-लोणार मुख्य रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनधारक हैराण

Poor condition of Koyali-Lonar main road :लोणार-कोयाळी या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्ता पूर्णतः उखडला असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

Poor condition

रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ता? कोयाळी-लोणार मार्ग धोकादायक

भागवत चव्हाण

कारेगाव : लोणार-कोयाळी या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्ता पूर्णतः उखडला असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना वाट काढत पुढे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी डांबरीकरण निखळून गिट्टी वर आली असून त्यामुळे वाहनांच्या टायरचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या मार्गावरून सोमठाणा, कारेगाव, ब्राह्मण चिकणा, महार चिकणा, खापरखेड, खळेगाव, अंजनी खुर्द, वाल्हूर, उदनापूर आदी गावांतील नागरिकांची नियमित ये-जा सुरू असते. लोणार हे तालुक्याचे प्रमुख ठिकाण आणि मोठी बाजारपेठ असल्याने शासकीय कामे, शैक्षणिक कारणे तसेच दैनंदिन व्यवहारांसाठी हजारो नागरिकांना या रस्त्याचा वापर करावा लागतो.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काटेरी झुडपांनी अतिक्रमण केल्याने वाहनचालकांची आणखी गैरसोय होत आहे. समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या झुडपांमुळे यापूर्वीही काही किरकोळ अपघात झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

पावसाळा तोंडावर आला असून खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानंतर त्यांची खोली लक्षात येणार नाही. त्यामुळे वाहनधारकांच्या अपघाताची शक्यता अधिक वाढणार आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्यावरील खड्डे बुजवून डागडुजी करावी, उखडलेली गिट्टी काढून रस्ता सुरळीत करावा तसेच रस्त्याच्या कडेला वाढलेली काटेरी झुडपे हटवावीत, अशी मागणी नागरिक आणि वाहनधारकांनी केली आहे.

याशिवाय या मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत, जेणेकरून वाहनचालकांना सुरक्षितपणे प्रवास करता येईल, अशीही मागणी पुढे येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top