Uddhav Sena : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सहा खासदारांनी दिल्ली येथे शिंदेसेनेत प्रवेश केल्याच्या वृत्तानंतर उद्धवसेनेच्या शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी मदनलाल धिंग्रा चौकात उद्धवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधित खासदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे पायदळी तुडवून दहन करण्यात आले.

‘जनादेशाशी गद्दारी’चा आरोप; उद्धवसेनेचे धिंग्रा चौकात उग्र आंदोलन
अकोला : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सहा खासदारांनी दिल्ली येथे शिंदेसेनेत प्रवेश केल्याच्या वृत्तानंतर उद्धवसेनेच्या शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी मदनलाल धिंग्रा चौकात उद्धवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधित खासदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे पायदळी तुडवून दहन करण्यात आले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सहा खासदारांनी दिल्ली येथे जाऊन शिंदेसेनेत प्रवेश केल्याचे समोर आल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ शिवसेना शहरप्रमुख (अकोला पश्चिम) आशिष गावंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
मध्यवर्ती बसस्थानकासमोरील हुतात्मा मदनलाल धिंग्रा चौकात आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत सहा खासदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी शिंदेसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सुरेंद्र विसपुते, जिल्हासंघटक भूषण भिरड, अकोला पूर्वचे शहरप्रमुख राहुल कराळे, मनपा गटनेते विजय इंगळे, नगरसेवक शंकर लंगोटे, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अभय खुमकर, अभिषेक खरसाडे, किरण अवताडे, साकलेन खान पठाण, दत्ता पाटील, आशू तिवारी, सोनू औतकार, अनिल परचुरे, प्रवीण शिंदे, योगेश गोतमारे, विशाल घरडे, विकी इंगळे, सोनू अत्तरकर, शुभम देशमुख, ऋषी देशमुख, हर्षल पाटील, रामभाऊ आमले यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, विभागप्रमुख, प्रभागप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदारसंघ पुनर्रचनेसाठी कटकारस्थानाचा आरोप
यावेळी बोलताना शहरप्रमुख आशिष गावंडे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. केंद्र सरकारने मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणासंदर्भातील विधेयके सादर केली होती. मात्र, आवश्यक संख्याबळ नसल्याने ती मंजूर होऊ शकली नाहीत. त्यानंतर विविध पक्षांतील खासदारांना फोडण्यासाठी भाजपने राजकीय कटकारस्थान रचल्याचा आरोप त्यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या प्रक्रियेत केवळ निमित्तमात्र असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.खासदारांच्या पक्षांतरामुळे जनतेच्या जनादेशाचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी संबंधित निर्णयाचा तीव्र निषेध नोंदविला.

