Action to be taken agains : जिल्ह्यात भेसळयुक्त खवा व पनीर विक्रीच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या उत्पादक व पुरवठादारांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत.

ग्राहकांची फसवणूक थांबवा; भेसळीविरोधात प्रशासन आक्रमक
बुलढाणा : जिल्ह्यात भेसळयुक्त खवा व पनीर विक्रीच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या उत्पादक व पुरवठादारांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दूध भेसळ नियंत्रण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत दूध उत्पादन, त्याचा वापर आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीतील ताळमेळ तसेच भेसळीच्या तक्रारींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अलीकडच्या काळात बाजारात पाम तेल, साखर आणि स्किम्ड मिल्क पावडर वापरून तयार केलेले पदार्थ ‘खवा’ म्हणून विकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच पाम तेलापासून तयार केलेले ‘चीज अॅीनालॉग’ हे ‘पनीर’ म्हणून विक्रीस ठेवले जात असल्याचेही समोर आले आहे. हे पदार्थ प्रामुख्याने गुजरातमधून १० किलोच्या पिशव्यांमध्ये ‘स्पेशल बर्फी’ किंवा प्लास्टिक डब्यांमध्ये ‘हलवा’ या नावाने बाजारात आणले जातात.
नियमानुसार, अशा पदार्थांच्या विक्रीवेळी त्यातील घटकांची स्पष्ट माहिती देणे बंधनकारक असताना अनेक विक्रेते ती न देता ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचे डॉ. किरण पाटील यांनी नमूद केले.या पार्श्वभूमीवर हॉटेल, रेस्टॉरंट आणि मिठाई विक्रेत्यांनी आपल्या मेनू कार्ड किंवा फलकावर पदार्थांबाबत स्पष्ट माहिती नमूद करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करताना अन्नपदार्थ खरेदी करताना लेबल, घटक व प्रकार नीट तपासावेत, असे सांगितले. संशयास्पद किंवा भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे किंवा १८००-२२२-३६५ या टोल-फ्री क्रमांकावर त्वरित तक्रार नोंदवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

