Mahabreaking

[breaking_news]

Siddhi Sonune : जिद्द, धैर्य आणि साहसाला सलाम; संस्कृती अर्बनने सिद्धी सोनुनेचा केला सन्मान

Siddhi Sonune : बुलढाणा जिल्ह्यातील साखळी बुद्रुक येथील कु. सिद्धी विठ्ठल सोनुने हिने अल्पवयातच गिर्यारोहण आणि साहसी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या अभिमानास्पद यशाबद्दल संस्कृती महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. यांच्या वतीने शनिवारी (दि. ११ जुलै) सायंकाळी ५ वाजता बुलढाणा शाखेत तिचा जाहीर सत्कार करण्यात आला.

Siddhi Sonune

अल्पवयात एव्हरेस्ट बेस कॅम्प सर; बुलढाण्याच्या सिद्धी सोनुनेचा गौरव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील साखळी बुद्रुक येथील कु. सिद्धी विठ्ठल सोनुने हिने अल्पवयातच गिर्यारोहण आणि साहसी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या अभिमानास्पद यशाबद्दल संस्कृती महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. यांच्या वतीने शनिवारी (दि. ११ जुलै) सायंकाळी ५ वाजता बुलढाणा शाखेत तिचा जाहीर सत्कार करण्यात आला.

सिद्धीने लहान वयापासूनच गिर्यारोहण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अवघ्या सातव्या वर्षी तिने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई सर केले. त्यानंतर आठव्या वर्षी हिमालयातील केदारकंठा ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केला. नवव्या वर्षी तिने हरिश्चंद्रगड, तारामती शिखर, कोकणकडा आणि शीतकडा यांसारखी आव्हानात्मक ठिकाणे यशस्वीरीत्या पादाक्रांत केली. विशेष म्हणजे, कोकणकडा हा सह्याद्रीतील सर्वाधिक धाडसी आणि आव्हानात्मक ठिकाणांपैकी एक मानला जातो. एवढ्या लहान वयात या मोहिमा पूर्ण करून सिद्धीने आपल्या जिद्द, धैर्य आणि आत्मविश्वासाची प्रचिती दिली.

सिद्धीची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे अवघ्या दहाव्या वर्षी तिने जगप्रसिद्ध माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प (५,३६४ मीटर) यशस्वीरीत्या सर केला. हिमालयातील प्रतिकूल हवामान, गोठवणारी थंडी, कमी ऑक्सिजन, उंच प्रदेशातील शारीरिक ताण आणि अनेक दिवसांचा पायी प्रवास अशा कठीण आव्हानांवर मात करत तिने ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. तिची ही कामगिरी मानसिक बळ, शारीरिक क्षमता, चिकाटी आणि आत्मविश्वासाचे प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.

एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमेसाठी सिद्धी रवाना होत असताना तिच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी संस्कृती अर्बनच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली होती. संस्थेने तिच्या जिद्दीवर विश्वास ठेवत दिलेल्या या सहकार्यामुळे तिच्या यशात मोलाचा वाटा उचलला. मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करून परतल्यानंतर तिच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी संस्थेने तिचा जाहीर सत्कार आयोजित केला.

यावेळी संस्थापक अध्यक्ष निलेश दे. गोरे यांनी सिद्धीच्या कार्याचे कौतुक करत, “अशा होतकरू आणि ध्येयवेड्या मुलींना प्रोत्साहन देणे हे समाजाचे कर्तव्य आहे. संस्कृती अर्बन भविष्यातही अशा गुणवंत विद्यार्थ्यांना आणि खेळाडूंना नेहमीच सहकार्य करेल,” असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमास अध्यक्षा विशाखा गोरे, गोपाल नीलकंठ, बाळू हुडेकर, संजय राऊत, शंकर राऊत, राजेश पवार, अनंता लहासे, प्रमोद माळी, देवराव हुडेकर, ढगे सर, रमेश हिराळकर यांच्यासह संस्कृती अर्बनचे अधिकारी, कर्मचारी, सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी सिद्धी सोनुने हिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत तिच्या जिद्द, धैर्य आणि साहसी वृत्तीचे कौतुक केले. तिच्या यशामुळे जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना आणि युवकांना नवे ध्येय गाठण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top