PM Kisan : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ३ लाख ३६ हजार ८२५ पात्र शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यांमध्ये एकूण ६७ कोटी ३६ लाख ५० हजार रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

केंद्राचे दोन हजार, राज्याचे पाच हजार; केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा शेतकऱ्यांना आधार-प्रतापराव जाधव
बुलढाणा : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ३ लाख ३६ हजार ८२५ पात्र शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यांमध्ये एकूण ६७ कोटी ३६ लाख ५० हजार रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्रात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद वाकळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश जाधव, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अमोल झापे, ओमसिंग राजपूत, अनुजा सावळे, ॲड. गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी आणि पत्रकार उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा २४ वा हप्ता जमा करण्यात आला आहे. यासोबतच राज्य शासनाकडून दुष्काळसदृश परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पाच हजार रुपयांचा अग्रीम लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही योजनांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी एकूण सात हजार रुपयांचा आर्थिक आधार मिळणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर
बदलते हवामान आणि अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे शेतीसमोर निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. अँड्रॉइड मोबाईल आणि डिजिटल माध्यमांचा उपयोग करून पिकांवरील रोग व किडींचे छायाचित्र अपलोड करून त्यांचे निदान व आवश्यक मार्गदर्शन मिळविण्याची सुविधा शेतकऱ्यांनी वापरावी, असे सांगण्यात आले.
तसेच माती परीक्षणाचे अहवाल शेतकऱ्यांना सहज समजतील अशा सोप्या मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. मातीतील नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) यांचे प्रमाण शेतकऱ्यांना सहज समजेल, अशा पद्धतीने अहवाल तयार करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या.
रब्बी हंगामात चारा पिकांच्या नियोजनाला प्राधान्य
आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याची गरज आणि पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता विचारात घेऊन शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाचे नियोजन करावे. हरभरा, ज्वारी तसेच चारा पिकांच्या लागवडीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले. चारा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून हमीभावाने चारा खरेदी करण्याबाबतही यावेळी माहिती देण्यात आली.
विकसित भारताच्या संकल्पनेत महिलांचा सहभाग महत्त्वाचा
विकसित भारत २०४७ चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिला सक्षमीकरण आणि आर्थिक उपक्रमांमधील त्यांचा सहभाग वाढविणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासोबतच महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगार आणि उत्पन्ननिर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. कृषी क्षेत्राच्या विकासात महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अमोल झापे यांनी केले. विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी कृषी क्षेत्रातील विविध योजनांची माहिती दिली. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आगामी रब्बी हंगामाचे नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच पाणी आणि चारा व्यवस्थापनाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी विविध महिला बचत गटांच्या प्रतिनिधींचा तसेच प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला.

