No Chief Officer : बाळापूर नगर परिषदेत गेल्या साडेचार वर्षांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी पद रिक्त असून प्रशासन अधिकारी पदही मागील दोन वर्षांपासून भरले गेलेले नाही. महत्त्वाच्या प्रशासकीय पदांची ही रिक्तता नगर परिषदेच्या कारभारावर परिणाम करत असून विकासकामांची गती मंदावल्याची चर्चा शहरात सुरू आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित राहिल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

प्रशासकीय रिक्त पदांमुळे विकासकामांना ब्रेक; घरकुल प्रकल्पासह अनेक कामांवर संशयाचे सावट
जाकीर अहमद शेख
बाळापूर : बाळापूर नगर परिषदेत गेल्या साडेचार वर्षांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी पद रिक्त असून प्रशासन अधिकारी पदही मागील दोन वर्षांपासून भरले गेलेले नाही. महत्त्वाच्या प्रशासकीय पदांची ही रिक्तता नगर परिषदेच्या कारभारावर परिणाम करत असून विकासकामांची गती मंदावल्याची चर्चा शहरात सुरू आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित राहिल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
विशेषतः घरकुल (आयटीआय) परिसरात करण्यात आलेल्या विविध विकासकामांच्या गुणवत्तेबाबत तसेच निधीच्या वापराबाबत लोकप्रतिनिधींनी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. नगर परिषदेत स्थायी प्रशासकीय नेतृत्व नसल्यामुळे विकासकामांच्या देखरेखीवर आणि गुणवत्ता नियंत्रणावर परिणाम झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. सध्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कारभार सुरू असल्याने निर्णय प्रक्रियेत विलंब होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नगरसेवकांनी घरकुल (आयटीआय) परिसरात करण्यात आलेल्या बांधकामांची तांत्रिक आणि आर्थिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित कामांची गुणवत्ता, तांत्रिक निकष, आयुष्यमान आणि खर्चाचा तपशील सार्वजनिक करावा, अशी मागणी होत आहे. तसेच या कामांसाठी जबाबदार असलेल्या संबंधित यंत्रणा आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, असेही मत व्यक्त केले जात आहे.
नगर परिषदेच्या बांधकाम विभागात तीन ते चार अभियंते कार्यरत असतानाही अनेक विकासकामांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये असंतोष आहे. काही रस्ते अल्पावधीतच खराब झाल्याच्या तक्रारी असून अनेक नाल्यांची कामे अपूर्ण किंवा निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप केला जात आहे. नाल्यांवरील झाकणांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
नगरातील अनेक प्रभागांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. काही भागांत तीन ते पाच दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार आहे. याशिवाय पाण्याला दुर्गंधी येणे आणि पाण्याचा रंग बदलल्याच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
मुख्याधिकारी आणि प्रशासन अधिकारी यांची तातडीने नियुक्ती करून शहरातील रखडलेली विकासकामे मार्गी लावावीत तसेच घरकुल प्रकल्प, रस्ते, नाल्या आणि पाणीपुरवठा व्यवस्थेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी शासनाकडे केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

