building : बीबी येथील पशुवैद्यकीय दवाखाना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कथित सततच्या गैरहजेरीमुळे दुरवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे. दवाखान्यात वेळेवर उपचार मिळत नसल्याने बीबीसह परिसरातील पशुपालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या स्वतंत्र इमारतीची अवस्था पाहता, या दवाखान्याच्या नियमित कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दारूच्या बाटल्या, कचऱ्याचे साम्राज्य अन् अधिकारी गैरहजर; बीबीतील पशुदवाखाना चर्चेत
रमेश खंडागळे
बीबी : बीबी येथील पशुवैद्यकीय दवाखाना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कथित सततच्या गैरहजेरीमुळे दुरवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे. दवाखान्यात वेळेवर उपचार मिळत नसल्याने बीबीसह परिसरातील पशुपालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या स्वतंत्र इमारतीची अवस्था पाहता, या दवाखान्याच्या नियमित कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बीबी व परिसरातील गावांमधील पशुधनाला वेळेवर उपचार मिळावेत आणि पशुपालनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने येथे पशुवैद्यकीय दवाखान्याची स्वतंत्र इमारत उभारण्यात आली. मात्र, संबंधित अधिकारी नियमितपणे उपस्थित राहत नसल्याची तक्रार पशुपालकांकडून केली जात आहे. महिनोन्महिने अधिकारी दवाखान्यात येत नसल्याचा आरोप असून, येथे नेमके कोण कार्यरत आहे, याचीही स्थानिक नागरिकांना माहिती मिळत नसल्याचे सांगितले जाते.
दवाखान्याच्या परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य
दवाखान्याच्या आवारात सर्वत्र कचरा आणि अस्वच्छता दिसून येत आहे. औषधांसाठी तयार करण्यात आलेली लाकडी कपाटे आवारात अस्ताव्यस्त पडलेली आहेत. परिसरात देशी-विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्याही आढळून येत असल्याचे चित्र आहे. स्वच्छतागृह कचऱ्याने भरलेले असून, ते अनेक महिन्यांपासून वापराविना असल्याचे दिसते. दवाखान्याची नामफलकाची पाटीही खाली पडलेली असून, त्यावर पालापाचोळा साचला आहे.
दवाखान्याच्या आवारातील झाडांच्या मुळाशी कचरा जाळण्यात आल्याचेही दिसून येते. त्यामुळे काही झाडे वाळल्याचे चित्र आहे. पशुधनाच्या उपचारासाठी उभारलेल्या या केंद्राच्या परिसराची अशी अवस्था असल्याने दवाखान्याच्या देखभाल आणि स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
खासगी उपचारांसाठी पशुपालकांना आर्थिक भुर्दंड
शासकीय दवाखान्यात वेळेवर उपचार मिळत नसल्याने पशुपालकांना खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागत असून, उपचारांना विलंब झाल्यास आजारी पशुधनाची हेळसांड होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे दवाखाना नियमित सुरू ठेवून पशुधनाला वेळेवर उपचार उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तोंडी आदेश; अंमलबजावणीकडे लक्ष
या प्रकरणाबाबत प्रतिनिधींनी प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी श्री. खेडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित अडचणी सहाय्यक आयुक्तांकडे मांडण्यास सांगितले. त्यानंतर सहाय्यक आयुक्त डॉ. रायबोले यांची भेट घेतली असता, त्यांनी श्री. खेडेकर यांना दवाखान्यात स्वच्छता राखण्यासह पशुधनाला वेळेवर उपचार मिळावेत यासाठी नियमित उपस्थित राहण्याचे तोंडी आदेश दिल्याचे सांगण्यात आले.
मात्र, या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार आणि बीबीचा पशुवैद्यकीय दवाखाना नियमितपणे सुरू होणार कधी, असा प्रश्न पशुपालकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करून कर्तव्यात कसूर आढळल्यास योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही पशुपालकांकडून होत आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

