Rajarshi Shahu Maharaj : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२व्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच सम्यक समन्वय समितीच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. सामाजिक सलोखा, समता आणि शाहू विचारांचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मिरवणुकीला शहरातील विविध सामाजिक संस्था, समविचारी संघटना, आंबेडकरी व बहुजनवादी विचारांचे कार्यकर्ते तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

‘शाहू विचारांचा जागर’; सम्यक समन्वय समितीतर्फे प्रथमच जिल्हास्तरीय मिरवणुकीचे यशस्वी आयोजन
बुलढाणा : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२व्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच सम्यक समन्वय समितीच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. सामाजिक सलोखा, समता आणि शाहू विचारांचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मिरवणुकीला शहरातील विविध सामाजिक संस्था, समविचारी संघटना, आंबेडकरी व बहुजनवादी विचारांचे कार्यकर्ते तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणगाव परिषदेत व्यक्त केलेल्या, “एक वेळ माझा जन्मदिवस साजरा करू नका, पण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती सणाप्रमाणे साजरी करा,” या विचाराचा प्रेरणास्रोत मानून सम्यक समन्वय समितीने या मिरवणुकीचे आयोजन केले होते.
मिरवणुकीचा प्रारंभ जयस्तंभ चौक येथील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. यश सिद्धी सैनिक सेवा संघाच्या वतीने मानवंदना देण्यात आल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला.
ढोल-ताशा पथक, लेझीम पथक, यश सिद्धी सैनिक सेवा संघाचे जवान, राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा असलेला सुशोभित रथ तसेच महिला व पुरुषांचा मोठा सहभाग हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. “बहुजनवादी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
जयस्तंभ चौकातून निघालेली मिरवणूक एसबीआय चौक मार्गे आयडीबीआय चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचली. तेथे शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यश सिद्धी सैनिक सेवा संघाच्या जवानांनी मानवंदना दिली. त्यानंतर उपस्थित सर्वांनी अभिवादन केले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
अल्पावधीत नियोजन करूनही अत्यंत शिस्तबद्ध, शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या मिरवणुकीचे शहरभर कौतुक होत आहे. शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जात असले, तरी बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच अशा स्वरूपाची भव्य मिरवणूक काढण्यात आल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
या यशस्वी आयोजनासाठी सम्यक समन्वय समितीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी मोलाचे योगदान दिल्याबद्दल आयोजकांनी त्यांचे आभार मानले.

