25-foot angle pierces : नियमबाह्य आणि बेफिकीर वाहतुकीमुळे किती मोठी दुर्घटना घडू शकते, याचे धक्कादायक उदाहरण शनिवारी डोणगाव-मुंबई-नागपूर राज्य महामार्गावर पाहायला मिळाले. अवघ्या १० फुटांच्या मालवाहू वाहनातून तब्बल २५ फुटांचे लोखंडी अँगल वाहून नेले जात असताना ते समोरून येणाऱ्या वऱ्हाडाच्या क्रुझर वाहनात घुसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात महिला आणि लहान मुलांसह अनेक जण जखमी झाले असून, क्रुझरच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

हिवरा साबळे फाट्याजवळ थरकाप उडवणारा अपघात; महिला-मुलांसह अनेक जखमी
डोणगाव : नियमबाह्य आणि बेफिकीर वाहतुकीमुळे किती मोठी दुर्घटना घडू शकते, याचे धक्कादायक उदाहरण शनिवारी डोणगाव-मुंबई-नागपूर राज्य महामार्गावर पाहायला मिळाले. अवघ्या १० फुटांच्या मालवाहू वाहनातून तब्बल २५ फुटांचे लोखंडी अँगल वाहून नेले जात असताना ते समोरून येणाऱ्या वऱ्हाडाच्या क्रुझर वाहनात घुसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात महिला आणि लहान मुलांसह अनेक जण जखमी झाले असून, क्रुझरच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
ही घटना २० जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हिवरा साबळे फाट्याजवळ घडली. डोणगावकडून मेहकरकडे जाणारे क्रुझर वाहन (क्रमांक MH 37 AH 2722) आणि मेहकरकडून डोणगावकडे लोखंडी अँगल घेऊन जाणारे मालवाहू वाहन (क्रमांक MH 47 Y 3976) यांच्यात समोरासमोर धडक झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मालवाहू वाहनात क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक लांबीचे लोखंडी अँगल भरले होते. हे अँगल वाहनाच्या दोन्ही बाजूंनी सुमारे सहा ते सात फूट बाहेर निघालेले होते. धडक होताच हे टोकदार अँगल थेट क्रुझरच्या केबिनमध्ये घुसले. त्यामुळे वाहनाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
विशेष म्हणजे, क्रुझरमध्ये वऱ्हाड असल्याने समोरील बाजूस महिला आणि लहान मुले बसलेली होती. लोखंडी अँगल अचानक केबिनमध्ये घुसल्याने त्यांना दुखापती झाल्या. अपघाताचे दृश्य इतके भयावह होते की घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या अंगावर काटा आला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. माहिती मिळताच डोणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आणि नागरिकांनी संयुक्तपणे बचावकार्य राबवत जखमींना वाहनातून बाहेर काढले. सर्व जखमींना तातडीने मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नियमांची पायमल्ली; कारवाईची मागणी
या अपघातानंतर वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियमानुसार लोखंडी गज, पाईप, अँगल किंवा तत्सम साहित्याची वाहतूक करताना ते वाहनाच्या बॉडीबाहेर धोकादायक पद्धतीने निघणार नाही याची खबरदारी घेणे बंधनकारक आहे. मात्र, संबंधित वाहनातून तब्बल १५ ते २५ फुटांचे अँगल उघडपणे वाहून नेले जात होते.
परिवहन विभाग आणि महामार्ग पोलिसांच्या देखरेखीखाली अशा प्रकारची धोकादायक वाहतूक कशी सुरू राहते, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. या अपघातानंतर तरी नियमबाह्य मालवाहतुकीवर कठोर कारवाई होणार का, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेने महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा निष्काळजीपणामुळे भविष्यात आणखी मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

