Mahabreaking

[breaking_news]

Farmers protest march :बैलगाड्यांतून शेतकऱ्यांचा एल्गार; सरसकट कर्जमुक्तीसाठी मेहकरात जनआक्रोश विराट मोर्चा

Farmers protest march : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी, पीकविमा, नुकसानभरपाई व इतर प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुधवारी मेहकर येथे भव्य ‘शेतकरी जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. तब्बल ११ बैलगाड्यांच्या सहभागामुळे या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार सिद्धार्थ खरात यांनी स्वतः बैलगाडीत बसून मोर्चाचे नेतृत्व केल्याने आंदोलनाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले.

Farmers protest march
अंबादास दानवे व आ. सिद्धार्थ खरात बैलगाडीतून तहसीलवर; कर्जमाफीच्या जीआरची होळी करून सरकारचा निषेध

मेहकर : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी, पीकविमा, नुकसानभरपाई व इतर प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुधवारी मेहकर येथे भव्य ‘शेतकरी जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. तब्बल ११ बैलगाड्यांच्या सहभागामुळे या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार सिद्धार्थ खरात यांनी स्वतः बैलगाडीत बसून मोर्चाचे नेतृत्व केल्याने आंदोलनाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले.

Farmers protest
आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. हजारो शेतकरी, महिला, शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निघालेला मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
तहसील कार्यालयात उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या शासन निर्णयाची (जीआर) होळी करून आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या कर्जमाफी धोरणाचा निषेध नोंदविला.
मोर्चाला संबोधित करताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र आता विविध अटी-शर्थी लावून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “ही कर्जमाफी नसून वसुलीची योजना आहे. २००८ पासून अनेक शेतकरी विविध योजनांपासून वंचित आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत गंभीर नसल्याने राज्यभर संघर्ष उभारला जात आहे,” असे दानवे म्हणाले.
आमदार सिद्धार्थ खरात यांनीही सरकारच्या कर्जमाफी योजनेवर निशाणा साधला. “सध्याची कर्जमाफी योजना शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारी आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने सरसकट कर्जमुक्ती देण्यात आली होती, त्याच धर्तीवर आजही राज्यातील सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हा विराट मोर्चा काढण्यात आला आहे,” असे त्यांनी सांगितले.
या आंदोलनात जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा उपप्रमुख प्रा. आशिष रहाटे, तालुकाध्यक्ष निंबाजी पांडव, तालुका प्रमुख राजू बुधवंत, युवासेना तालुका प्रमुख आकाश घोडे, नगराध्यक्ष किशोर गारोळे, नगरसेवक महेश रिंढे, प्रा. सतीश ताजने, नितीन तुपे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top