Initiative for the Empowerment : दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि सर्वांगीण विकासाला चालना देणे या उद्देशाने शिक्षण विभाग, पंचायत समिती देऊळगाव राजा यांच्या वतीने महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. समग्र शिक्षा अभियानाच्या समावेशित शिक्षण विभागांतर्गत अलीम्को तपासणी प्रक्रियेनंतर निवड झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य व सहाय्यक साधनांचे वितरण करण्यात आले.

समावेशित शिक्षणाला बळ; देऊळगाव राजात दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वितरण
गजानन तिडके
देऊळगाव राजा : दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि सर्वांगीण विकासाला चालना देणे या उद्देशाने शिक्षण विभाग, पंचायत समिती देऊळगाव राजा यांच्या वतीने महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. समग्र शिक्षा अभियानाच्या समावेशित शिक्षण विभागांतर्गत अलीम्को तपासणी प्रक्रियेनंतर निवड झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य व सहाय्यक साधनांचे वितरण करण्यात आले.
दि. 1 जून रोजी पंचायत समिती देऊळगाव राजा सभागृहात आयोजित कार्यक्रमात सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज देवानंद कायंदे यांच्या मातोश्री तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा नंदाताई कायंदे यांच्या शुभहस्ते 20 दिव्यांग विद्यार्थ्यांना 31 विविध साहित्य व सहाय्यक साधनांचे वितरण करण्यात आले.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार देण्यात आलेल्या या साहित्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होणार असून शिक्षण अधिक सुलभ आणि प्रभावी होणार आहे. तसेच त्यांच्या स्वावलंबनाला चालना मिळून शैक्षणिक प्रगतीसह सामाजिक सहभाग वाढण्यासही मदत होणार असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमाला गटविकास अधिकारी मुकेश माहोर, सहाय्यक गटविकास अधिकारी विशाल चौधर, गटशिक्षणाधिकारी श्रीकृष्ण सपकाळ, शिक्षण विस्तार अधिकारी दादाराव मुसदवाले, केंद्रप्रमुख सोनुने तसेच प्रशासन अधिकारी गजानन वायाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे सांगितले. दिव्यांग विद्यार्थ्यांनीही उपलब्ध सुविधांचा लाभ घेत आत्मविश्वासाने शिक्षण पूर्ण करून समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने दिव्यांग विद्यार्थी, पालक आणि शिक्षक उपस्थित होते. शिक्षण विभागाचा हा उपक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि समावेशक शिक्षणाला बळकटी देण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

