Dhaba to Lohagad road : तालुक्यातील धाबा ते लोहगड तांडा या मार्गाची अक्षरशः चाळणी झाली असून रस्त्यावरील मोठमोठे खड्डे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था कायम असल्याने ग्रामस्थ, शेतकरी आणि नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला; तातडीने डांबरीकरणाची मागणी
बार्शीटाकळी : तालुक्यातील धाबा ते लोहगड तांडा या मार्गाची अक्षरशः चाळणी झाली असून रस्त्यावरील मोठमोठे खड्डे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था कायम असल्याने ग्रामस्थ, शेतकरी आणि नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
धाबा ते लोहगड तांडा या मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांसह इतर वाहनधारकांच्या अपघाताचा धोका वाढला आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी तसेच विविध सामाजिक संघटनांनी अनेकवेळा संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र, अद्यापही रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. विशेष म्हणजे धाबा ते लोहगड तांडा या भागातील काही अंतराचे डांबरीकरण अद्याप रखडले असून उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
दरम्यान, धाबा-बार्शीटाकळी मार्गाचे डांबरीकरण गेल्या वर्षी करण्यात आले होते. मात्र, काही महिन्यांतच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून डांबर उखडल्याचे दिसून आले. त्यानंतर संबंधित विभागाने तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्याचे काम केले. परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे ठरल्याने रस्त्याची अवस्था पुन्हा पूर्ववत झाली आहे.
संबंधित विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन धाबा ते लोहगड रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे तसेच धाबा-बार्शीटाकळी मार्गाची दर्जेदार पुनर्दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

