yellow sorghum and rice : सणासुदीच्या काळात गरीब व मध्यमवर्गीयांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या स्वस्त धान्य योजनेंतर्गत निकृष्ट दर्जाच्या ज्वारी आणि तांदळाचे वितरण केल्याचा प्रकार मासरूळ गावात उघड झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून गावातील रेशन दुकानातून पिवळसर, काळसर आणि दुर्गंधीयुक्त ज्वारी व तांदूळ दिला जात असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.

पंडीत सावळे
मासरूळ : सणासुदीच्या काळात गरीब व मध्यमवर्गीयांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या स्वस्त धान्य योजनेंतर्गत निकृष्ट दर्जाच्या ज्वारी आणि तांदळाचे वितरण केल्याचा प्रकार मासरूळ गावात उघड झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून गावातील रेशन दुकानातून पिवळसर, काळसर आणि दुर्गंधीयुक्त ज्वारी व तांदूळ दिला जात असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा तांदूळ तीन ते चार वर्षे जुना असून जनावरांनीही नाकारावा असा दर्जाहीन आहे. शासनाने नवीन धान्याचे वितरण करण्याचे आदेश दिले असतानाही जुन्या तांदळाचा पुरवठा सुरू असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि राज्य शासनाच्या योजनेतून पात्र लाभार्थ्यांना दोन ते तीन रुपये किलो दराने, तसेच काहींना मोफत तांदूळ वितरित केला जातो.मात्र, बुलडाणा तालुक्यातील मासरूळ येथे सतत निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित होत असल्याने लाभार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
गोदामातून तांदूळ व ज्वारी रेशन दुकानात पोहोचण्याआधी त्याचे निरीक्षण करण्याची जबाबदारी राजपत्रित निरीक्षण अधिकाऱ्यांवर असते. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर निकृष्ट धान्य कसे पोहोचले, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्य शासनाने स्पष्ट आदेश देऊन म्हटले आहे की, स्वस्त धान्य दुकानात केवळ नवीन हंगामातील तांदूळ-ज्वारीच पुरवठा होणे आवश्यक आहे.तथापि, मासरूळ व परिसरात जुन्या तांदळासोबतच काही प्रमाणात नवीन तांदूळ मिसळून वितरण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब धान्य पुरवठा व वितरणातील संभाव्य गैरव्यवहाराकडे निर्देश करते.भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हे राज्यातील प्रमुख धान्य उत्पादक जिल्हे असल्याने या जिल्ह्यांमधून येणाऱ्या पुरवठ्याची तपासणी आणि गुणवत्ता नियंत्रणाची तातडीची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर देशमुख यांनी सांगितले की,“शासकीय आधारभूत खरेदी केंद्रातून घेतलेला ताजा तांदूळ आणि ज्वारी देण्याचे नियम आहेत. पण रेशन दुकानात तीन ते चार वर्षे जुने धान्य वितरित होत आहे. यामागे मोठा गैरव्यवहार असण्याची शक्यता आहे. चौकशी झाल्यास मोठे मासे गळाला लागतील.”त्यांनी पुढे म्हटले की, “अधिकारी केवळ धान्य बदलून देण्याचे आश्वासन देतात, पण दोषींवर कारवाई मात्र होत नाही.”
नीलिमा कुरकुडे, पुरवठा निरीक्षक, बुलडाणा म्हणाल्या,“शासकीय स्वस्त धान्य दुकानात वितरित करण्यात येणारा तांदूळ किंवा ज्वारी निकृष्ट असल्यास लाभार्थ्यांनी थेट माझ्याकडे तक्रार करावी. निकृष्ट धान्य त्वरित बदलून दिले जाईल.”

