Shankarrao Shingne :तालुक्यातील राजकीय व सहकार क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक मंगळवारी शांततेत पार पडली. सभापतीपदी शंकरराव शिंगणे, तर उपसभापतीपदी भगवान खरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

आजी-माजी आमदारांचा ‘फॉर्म्युला’ यशस्वी; राजकीय विरोधक, पण शेतकरी हितासाठी एकत्र!
गजानन तिडके
देऊळगाव राजा : तालुक्यातील राजकीय व सहकार क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक मंगळवारी शांततेत पार पडली. सभापतीपदी शंकरराव शिंगणे, तर उपसभापतीपदी भगवान खरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, विधानसभा राजकारणात एकमेकांचे राजकीय विरोधक मानले जाणारे आमदार मनोज कायंदे आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या गटांमध्ये झालेल्या समन्वयामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विदर्भाचे प्रवेशद्वार आणि पश्चिम विदर्भातील महत्त्वाची कृषी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीला तालुक्यात विशेष महत्त्व आहे. काही महिन्यांपूर्वी तत्कालीन सभापती समाधान शिंगणे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याच्या मंजुरीस झालेला विलंब हा सहकार आणि राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने बाजार समितीच्या नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
तालुक्यात सहकार क्षेत्रावर मजबूत पकड असलेले माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि विधानसभा निवडणुकीनंतर युवक नेतृत्व म्हणून उदयास आलेले आमदार मनोज कायंदे हे राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या गटांचे प्रतिनिधित्व करत असले, तरी शेतकरी हिताच्या मुद्द्यावर दोन्ही गटांनी समन्वय साधल्याचे या निवडणुकीत दिसून आले. सूत्रांच्या माहितीनुसार, सभापतीपद डॉ. शिंगणे समर्थक गटाकडे, तर उपसभापतीपद आमदार कायंदे समर्थक गटाकडे देण्याबाबत सहमती झाल्याची चर्चा होती.
निवडणूक प्रक्रियेला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. अध्यक्ष अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक एस. बी. शितोळे यांनी काम पाहिले, तर बाजार समितीचे सचिव किशोर म्हस्के यांनी सहाय्यक म्हणून जबाबदारी सांभाळली. अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान सभापती पदासाठी शंकरराव शिंगणे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. उपसभापती पदासाठी गणेश डोईफोडे आणि भगवान खरात यांनी अर्ज दाखल केला होता; मात्र अर्ज माघारीच्या प्रक्रियेत गणेश डोईफोडे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने भगवान खरात यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
यावेळी बाजार समितीचे सदस्य समाधान शिंगणे, संतोष खांडेभराड, डॉ. रामप्रसाद शेळके, दादाराव खार्डे, नारायण कोल्हे, गणेश डोईफोडे, बद्रीनाथ शिंदे, संजय पर्हाड, सौ. संध्या देशमुख, सौ. शोभा कणखर यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. बाजार समितीचे सचिव किशोर म्हस्के तसेच कर्मचारी वर्गही यावेळी उपस्थित होता.
दरम्यान, या निवडणुकीतून देऊळगाव राजा तालुक्यातील सहकार आणि कृषी राजकारणात आजी-माजी आमदारांच्या प्रभावाची पुन्हा एकदा प्रचिती आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

