Husband who strangled wife : पत्नीचा साडीने गळा आवळून खून केल्याप्रकरणी देऊळगाव राजा येथील आरोपी सुनिल भास्कर गित्ते (वय ३५) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपीला भारतीय दंड विधान कलम ३०२ आणि ३२३ अंतर्गत दोषी ठरविले.

देऊळगाव राजा खूनप्रकरणी न्यायालयाचा कठोर निर्णय; बालसाक्षीदारास नुकसानभरपाईचे आदेश
गजानन तिडके
देऊळगाव राजा : पत्नीचा साडीने गळा आवळून खून केल्याप्रकरणी देऊळगाव राजा येथील आरोपी सुनिल भास्कर गित्ते (वय ३५) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपीला भारतीय दंड विधान कलम ३०२ आणि ३२३ अंतर्गत दोषी ठरविले. न्यायालयाने आरोपीला कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास, तसेच कलम ३२३ अंतर्गत सहा महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
प्रकरणातील माहितीनुसार, ३ एप्रिल २०२३ रोजी देऊळगाव राजा येथे आरोपी सुनिल गित्ते याने पत्नी शिवकन्या सुनिल गित्ते (वय २५) हिचा राहत्या घरी साडीने गळा आवळून खून केल्याचा आरोप होता. सुरुवातीला या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान मृत्यू संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे यांनी इनक्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे मृतकाच्या गळ्यावर जखमांचे निशाण असल्याचे निदर्शनास आणले. तसेच घटनेपूर्वी आरोपी आणि मृतक यांच्यात वाद झाल्याचेही तपासात समोर आले.
मृतक शिवकन्या बेशुद्ध अवस्थेत घरातील खोलीत आढळल्यानंतर शेजारी कल्पना बोधने यांनी तिला कृत्रिम श्वास देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शेजारी राहुल कायंदे यांच्या वाहनातून तिला देऊळगाव राजा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले होते. शवविच्छेदन अहवालात गळ्यावर जखमा आढळल्याने पोलिसांनी ६ एप्रिल २०२३ रोजी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
न्यायालयाने दंडाच्या एकूण रकमेपैकी ८ हजार रुपये बालसाक्षीदार प्रतीक सुनिल गित्ते याला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी क्रमांक २ भास्कर गित्ते यांचे न्यायप्रक्रियेदरम्यान निधन झाले, तर आरोपी क्रमांक ३ चंद्रभागाबाई गित्ते यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
सरकार पक्षातर्फे सरकारी वकील सोनाली सावजी देशपांडे यांनी बाजू मांडली, तर बचाव पक्षातर्फे अॅड. पी. आर. सानप यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणात देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनिल साळवे यांनी न्यायालयीन पैरवीत सहकार्य केले.

