Sudden Dizziness :येथील ३१ वर्षीय विवाहित आदिवासी युवकाचा १७ मे रोजी आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रामेश्वर वामन शिंदे असे मृतक युवकाचे नाव आहे.

सायखेड : येथील ३१ वर्षीय विवाहित आदिवासी युवकाचा १७ मे रोजी आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रामेश्वर वामन शिंदे असे मृतक युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायखेड येथील रामेश्वर वामन शिंदे हा युवक १४ मेपासून आजारी होता. त्याने धाबा येथील एका खासगी दवाखान्यात उपचारही घेतले होते. दरम्यान, १७ मे रोजी दुपारच्या सुमारास तो राहत्या घरी अचानक चक्कर येऊन खाली पडला. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्याला उपचारासाठी अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती बार्शीटाकळी पोलीस ठाण्याला देण्यात आली असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. युवकाचा मृत्यू नेमका उष्माघातामुळे झाला की अतिमद्यप्राशनामुळे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मृत रामेश्वर शिंदे यांच्या पश्चात वडील, पत्नी, सहा महिन्यांचा मुलगा, भाऊ व बहिण असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सायखेड परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

