Alleged Fraud : मेहकर तालुक्यातील एका खत विक्री केंद्रात शेतकऱ्यांच्या नावावर कथित बनावट ई-पॉस नोंदी करून अनुदानित खतांचा गैरवापर, खत विक्रीतील तफावत आणि परवाना नसलेल्या तसेच मुदत संपलेल्या उत्पादनांची विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने कृषी विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कृषी विभागाच्या तक्रारीवरून मेहकर शहर पोलीस ठाण्यात कृषी केंद्र चालकाविरोधात विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश श्यामसुंदर गट्टानी (रा. मेहकर, जि. बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे.

अनुदानित खतांचा काळाबाजार? मेहकरमध्ये कृषी विभागाची धाड; मोठी तफावत आढळल्याने गुन्हा दाखल
मेहकर : मेहकर तालुक्यातील एका खत विक्री केंद्रात शेतकऱ्यांच्या नावावर कथित बनावट ई-पॉस नोंदी करून अनुदानित खतांचा गैरवापर, खत विक्रीतील तफावत आणि परवाना नसलेल्या तसेच मुदत संपलेल्या उत्पादनांची विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने कृषी विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कृषी विभागाच्या तक्रारीवरून मेहकर शहर पोलीस ठाण्यात कृषी केंद्र चालकाविरोधात विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश श्यामसुंदर गट्टानी (रा. मेहकर, जि. बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मेहकर येथे कार्यरत कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक) उद्धव शामराव काळे यांनी मेहकर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, १५ मे २०२६ रोजी उकळी येथील शेतकरी नयन विश्वासराव खरात यांनी लेखी तक्रार देत, त्यांनी सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) खताच्या सहा बॅग खरेदी केल्या असताना त्यांच्या आधार संलग्न मोबाईलवर DAP खताच्या आठ बॅगा व 20:20:0:13 खताच्या १५ बॅगा खरेदी केल्याचा संदेश प्राप्त झाल्याची बाब निदर्शनास आणली होती.या तक्रारीच्या आधारे कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने १६ मे रोजी मेहकर येथील कथितरित्या संबंधित कृषी केंद्राची तपासणी केली. या पथकात कृषी विभागाचे अधिकारी सहभागी होते. तपासणीदरम्यान विक्री बिले, स्टॉक रजिस्टर आणि ई-पॉस प्रणालीतील नोंदींची पडताळणी करण्यात आली.
तपासणीत तक्रारदाराने SSP खताच्या सहा बॅग खरेदी केल्याचे बिल उपलब्ध असताना ई-पॉस प्रणालीमध्ये DAP आणि इतर खतांच्या बनावट नोंदी झाल्याचे निदर्शनास आल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. तसेच प्रत्यक्ष साठा आणि ई-पॉसवरील साठ्यामध्ये मोठी तफावत असल्याचेही आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.याशिवाय काही जैवउत्प्रेरक व खत उत्पादनांची विक्री वैध परवाना नसताना अथवा मुदत संपलेल्या परवान्यांवर होत असल्याचे कथितरीत्या समोर आले. काही उत्पादनांच्या लेबलवरील घटक आणि मंजूर परवान्यातील घटकांमध्ये फरक असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. संशयित खतांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे.
कृषी विभागाच्या तक्रारीनुसार, संबंधित विक्रेत्याकडून शेतकऱ्यांच्या नावावर आभासी स्वरूपात खत विक्री दाखवून अनुदानित खतांचा कथित गैरवापर व काळाबाजार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अजंठा ऍग्रो सर्व्हिस सेंटर दुकानाचे संचालक महेश श्यामसुंदर गट्टानी यांच्याविरुध्द मेहकर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३, अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ आणि खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

