Violation of court order: पातूर न्यायालयात सुरू असलेल्या कौटुंबिक हिंसाचार प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपी पतीने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून अल्पवयीन मुलासह पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पातूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध शोध मोहीम सुरू केली आहे.

पातूर : पातूर न्यायालयात सुरू असलेल्या कौटुंबिक हिंसाचार प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपी पतीने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून अल्पवयीन मुलासह पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पातूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध शोध मोहीम सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रद्धा भगवान शिरसाट (रा. आष्टूल, ता. पातूर) या ९ सप्टेंबर रोजी आपल्या रीषभ (अल्पवयीन) मुलासह न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित झाल्या होत्या. त्याच वेळी या प्रकरणातील आरोपी पती भगवान अर्जुन शिरसाट (वय ३५, रा. देगाव मानकी, ता. बाळापूर, जि. अकोला) सुद्धा न्यायालयात उपस्थित होता.
सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या परवानगीने आरोपी पतीने मुलाला भेट घेतली; मात्र काही क्षणातच त्याने मुलाला गाडीत बसवून न्यायालय परिसरातून पसार झाला. या प्रकारामुळे न्यायालयीन परिसरात एकच खळबळ उडाली.
या घटनेतून आरोपीने न्यायालयाच्या आदेशाचे उघड उल्लंघन केल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून पातूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. २९४/२०२५ नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध कलम ३१, ३२ कौटुंबिक हिंसा अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या प्रकरणाबाबत बोलताना पोलीस उपनिरीक्षक रमेश खंडारे यांनी सांगितले की, “सुनावणीदरम्यान आरोपी पतीला कोर्टाच्या परवानगीने मुलाला भेटण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र त्याने विश्वासघात करून मुलाला घेऊन पलायन केले. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपीचा सर्च वॉरंट काढण्यात आला आहे.”

