Dongaon :राज्य महामार्गावर वसलेले डोणगाव हे गाव सध्या चोरट्यांच्या सुळसुळाटामुळे भयभीत झाले आहे. मागील महिन्यातच चोरट्यांनी भरदिवसा डोणगाव येथील काही घरे फोडून मुद्देमाल लंपास केला होता. त्या प्रकरणाचा तपास अद्याप लागलेला नसतानाच पुन्हा एकदा चोरटे सक्रिय झाल्याची घटना समोर आली आहे.

डोणगाव : राज्य महामार्गावर वसलेले डोणगाव हे गाव सध्या चोरट्यांच्या सुळसुळाटामुळे भयभीत झाले आहे. मागील महिन्यातच चोरट्यांनी भरदिवसा डोणगाव येथील काही घरे फोडून मुद्देमाल लंपास केला होता. त्या प्रकरणाचा तपास अद्याप लागलेला नसतानाच पुन्हा एकदा चोरटे सक्रिय झाल्याची घटना समोर आली आहे.
दिनांक ७ ऑक्टोबर रोजी डोणगाव कृषी उत्पन्न उपबाजार समिती परिसरातील व्यापारी गजानन इंगळे यांच्या शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या गव्हाचे पाच कट्टे अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरून नेले. यापूर्वीही त्यांच्या अडत दुकानातून सुमारे दहा क्विंटल हरभरा व तुर चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती डोणगाव पोलिस ठाण्यात देण्यात आली असून, पोलिस कर्मचारी हर्ष सहगल यांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. मात्र, वृत्त लिहीपर्यंत संबंधित तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवली गेली नव्हती.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, डोणगाव पोलिस रात्रीच्या वेळी पायदळ गस्त घालत नसल्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढले आहे. तसेच, गावातील काही हॉटेल्सही मध्यरात्रीपर्यंत उघडी राहतात. त्यामुळे पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

