Lonar Municipality : लोणार नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत ८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता नगरपरिषद सभागृहात पार पडली. उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी रामराजे कापरे, नायब तहसीलदार प्रवीण देशमुख यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

प्रभाग निहाय आरक्षण साेडत जाहीर
लोणार : लोणार नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत ८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता नगरपरिषद सभागृहात पार पडली. उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी रामराजे कापरे, नायब तहसीलदार प्रवीण देशमुख यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
या सोडतीत एकूण २० नगरसेवक पदांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार, ५० टक्के जागा विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. त्यामुळे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा एकदा सक्रीय सहभागाची मोठी संधी प्राप्त झाली आहे.
मागील कार्यकाळात नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला वर्गासा :ठी राखीव होते. यंदा हे पद सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव झाल्याने शिक्षित, सक्षम आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत अनेक महिला राजकीय रणांगणात उतरतील, अशी चिन्हे दिसत आहेत.
या आरक्षण सोडतीच्या वेळी नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थी सैय्यद फैजल सैय्यद लुकमान यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्धपणे, उपस्थितांच्या साक्षीने पार पडली.
स्थानिक राजकारणातील दिग्गज, माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सभागृहात उपस्थित होते. आरक्षण जाहीर होताच काहींच्या चेहऱ्यावर आनंद तर काहींच्या चेहऱ्यावर निराशा दिसून आली. तर काही महिला इच्छुकांनी तत्काळ आपापल्या राजकीय रणनितीवर चर्चा सुरू केल्या.
एकंदरीत, या आरक्षणामुळे लोणार नगरपरिषदेच्या निवडणुकीत महिला उमेदवारांचे वर्चस्व राहणार हे स्पष्ट झाले आहे. स्थानिक राजकारणात महिलांच्या सहभागाची नवी पर्व सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.
प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे ठरले
प्रभाग क्र. १ – गट अ : नामनिर्देशित प्रवर्ग महिला | गट ब : सर्वसाधारण
प्रभाग क्र. २ – गट अ : नामनिर्देशित प्रवर्ग महिला | गट ब : सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३ – गट अ : सर्वसाधारण महिला | गट ब : सर्वसाधारण
प्रभाग क्र. ४ – गट अ : अनुसूचित जमाती महिला | गट ब : सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ५ – गट अ : अनुसूचित जाती | गट ब : सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ६ – गट अ : नामनिर्देशित प्रवर्ग महिला | गट ब : सर्वसाधारण
प्रभाग क्र. ७ – गट अ : सर्वसाधारण महिला | गट ब : सर्वसाधारण
प्रभाग क्र. ८ – गट अ : नामनिर्देशित प्रवर्ग | गट ब : सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ९ – गट अ : नामनिर्देशित प्रवर्ग | गट ब : सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. १० – गट अ : अनुसूचित जाती महिला | गट ब : सर्वसाधारण
महिला नेतृत्वाची नवी संधी
लोणार शहरातील राजकारणात महिलांचा सहभाग गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढला आहे. पुन्हा एकदा अर्ध्याहून अधिक जागा महिलांसाठी राखीव झाल्याने तरुणी, समाजसेविका आणि शिक्षिका या क्षेत्रातील नव्या चेहऱ्यांना राजकारणात संधी मिळणार आहे.
गत कार्यकाळात महिलांनी केलेल्या विकासकामांमुळे नागरिकांचा महिलांवरील विश्वास आणखी दृढ झाला आहे.
स्थानिक राजकारणात नवा उत्साह
नगराध्यक्ष पद महिला वर्गासाठी राखीव असल्याने विविध राजकीय पक्षांनी महिला उमेदवारांच्या शोधाला सुरूवात केली आहे.
काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे व ठाकरे गट), मनसे आणि स्थानिक आघाड्यांमध्ये संभाव्य उमेदवारांबाबत चर्चांचा जोर वाढला आहे.या सोडतीच्या वेळी माजी सभापती संतोष मापारी, माजी नगरसेवक डॉ. अनिल मापारी, काँग्रेसचे शांतीलाल गुगलिया, अनिकेत मापारी, इम्रान खान मोमीन खान, भूषण मापारी, शेख रऊफ, विकास मोरे, गजानन जाधव (ठाकरे गट), आबेद खान मोमीन खान, गुलाब सरदार यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.
आगामी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष
प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगरपरिषद निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे. इच्छुक उमेदवारांनी आता प्रचारयोजनेसाठी तयारी सुरू केली असून, पक्षीय समीकरणे नव्याने आखली जात आहेत. कोणते नवे चेहरे उदयास येतात आणि मतदार कोणाला नेतृत्वाची संधी देतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

