Mahabreaking

[breaking_news]

Sand Mafia: ‘रॉयल्टी’च्या आडून रेती माफियांचा सुळसुळाट; महसूल यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात!

Sand Mafia: ‘खडकपूर्णा नदीपात्र तसेच धरण परिसर हा जिल्ह्यातील अवैध रेती उपसा व वाहतुकीसाठी हॉटस्पॉट ठरला असून, या अवैध रेती तस्करांना आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक धडपड करत असले तरी सोबत काम करणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या गैरप्रकारांमुळे संबंधित पथकाची कार्यवाही पूर्ण होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी कारवाई का करत नाहीत, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.

Sand Mafia

 खडकपूर्णा घाटात दिवसाढवळ्या तस्करी; ‘अर्धे तुमचे- अर्धे आमचे’चा गंभीर आरोप

गजानन तिडके

 देऊळगाव राजा : खडकपूर्णा नदीपात्र तसेच धरण परिसर हा जिल्ह्यातील अवैध रेती उपसा व वाहतुकीसाठी हॉटस्पॉट ठरला असून, या अवैध रेती तस्करांना आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक धडपड करत असले तरी सोबत काम करणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या गैरप्रकारांमुळे संबंधित पथकाची कार्यवाही पूर्ण होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी कारवाई का करत नाहीत, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.

खडकपूर्णात रेती माफियांचा उच्छाद; ‘लीक’ करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कारवाई ठप्प!

खडकपूर्णा नदीपात्रालगत असलेल्या काही रेती घाटांचा लिलाव झाला असला तरी अवैध रेती तस्करांवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. उलट, ते कनिष्ठ महसूल कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आपले काम सुरळीतपणे करत असल्याने अधिकारीही हतबल झाल्याचे चित्र आहे. या सर्व बाबींची माहिती वरिष्ठांना असूनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने सामान्य जनतेत नाराजी व्यक्त होत आहे.

महसूल विभागाने अवैध रेती उपसा व वाहतूक रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकातील काही सदस्यांकडूनच तस्करांना माहिती पुरवली जात असल्याची चर्चा आहे. तस्करांशी असलेले त्यांचे आर्थिक संबंधही अधिकाऱ्यांना ज्ञात असूनही वरिष्ठ अधिकारी गप्प असल्याचा आरोप केला जात आहे.

दरम्यान, महिन्याकाठी ‘एन्ट्री फी’च्या स्वरूपात ठराविक रक्कम देऊन तस्करी सुरू असल्याचा आरोप समोर आला आहे. काही तस्करांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, एजंटमार्फत रक्कम पोहोचवली जाते आणि त्यामुळे कारवाईची भीती राहत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रथम विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करणे गरजेचे आहे.

अनेक वेळा ग्रामपातळीवरील महसूल कर्मचाऱ्यांचे तस्करांशी संगनमत असल्याचे पुरावे मिळूनही, संघटनांच्या दबावामुळे कारवाईत अडथळे निर्माण होत असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. काही कर्मचारी संघटनेच्या बळावर स्वतःवरील कारवाई टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसून येते.

तसेच, काही कर्मचारी आपले गैरप्रकार झाकण्यासाठी आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या नावाचा वापर करत असल्याचेही समोर आले आहे. मात्र, याबाबत स्थानिक पातळीवर केलेल्या पाहणीत लोकप्रतिनिधींचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शासनाच्या नोंदीनुसार फक्त चार रेती घाट अस्तित्वात असताना, प्रत्यक्षात १२ ते १३ मानवनिर्मित अवैध घाट तयार करून तस्करी सुरू असल्याचे आढळून आले आहे. भरभरे टाकरखेड, निमगाव गुरु, नारायणखेड, देऊळगाव मही या घाटांची अधिकृत नोंद असून, त्यापैकी काही घाटांचा लिलाव झाला आहे. मात्र, त्या रॉयल्टी पावत्यांचा गैरवापर करून अवैध रेती वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

कुंभारझरी, चिंचखेड, सुलतानपूर, गारगुंडी, सिंगाव नाला, बोबडेवाडी, मेव्हणा राजा, गारखेड आदी ठिकाणी मानवनिर्मित रेती घाट तयार झाले असून, प्रशासनाला याची माहिती असूनही कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

  तालुक्यातील दोन रेती घाटांचा लिलाव झाला असून त्यांच्या रॉयल्टी पावत्यांचा काही ठिकाणी गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. तसेच विभागातील काही कर्मचारी रेती तस्करांशी संगनमत करत असल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले असून, त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येईल.

— सायली जाधव, नायब तहसीलदार (महसूल), देऊळगाव राजा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top