Mahabreaking

[breaking_news]

Amol Gaikwad :“वयोवृद्ध हेच गावाचे वैभव” – अमोल गायकवाड; विद्यार्थ्यांना दिला संस्कारांचा संदेश

Amol Gaikwad :“ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिक हेच गावाचे खरे वैभव असून ते अनुभव, ज्ञान आणि संस्कारांचा अमूल्य खजिना आहेत,” असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी केले. मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथे आयोजित जातीय सलोखा, सुसंवाद आणि सन्मान कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन करत होते.

Amol Gaikwad

ज्येष्ठांचा सन्मान म्हणजे संस्कृतीचा मान; घाटबोरीत प्रेरणादायी सोहळा

डोणगाव : “ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिक हेच गावाचे खरे वैभव असून ते अनुभव, ज्ञान आणि संस्कारांचा अमूल्य खजिना आहेत,” असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी केले. मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथे आयोजित जातीय सलोखा, सुसंवाद आणि सन्मान कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन करत होते.

यावेळी त्यांनी तरुण पिढीने ज्येष्ठांचा आदर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “धोती-टोपीची परंपरा जपणारी ही शेवटची पिढी आहे. त्यांच्या संस्कारांतूनच समाज समृद्ध होतो,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना संस्कार आणि मूल्यांचे धडे दिले.

Amol Gaikwad

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानबा पाटील नवले होते. व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडे, गटविकास अधिकारी दिनकरराव खरात, कृषी अधिकारी संदीप मेटांगळे, मंडळ अधिकारी महादेव गायकवाड, ठाणेदार अमरनाथ नागरे, ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार, सरपंच राजकुमार पाखरे, माजी सरपंच गजानन चनेवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संतोष खांडे यांनी स्वतःच्या संघर्षमय जीवनाचा अनुभव सांगत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. “माझे आई-वडील ऊसतोड मजूर होते. त्यांच्या कष्टातून मला शिक्षणाची जाणीव झाली आणि त्यातूनच मी पोलीस अधिकारी झालो. विद्यार्थ्यांनीही आपल्या पालकांच्या मेहनतीची जाणीव ठेवून प्रगती साधावी,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ नागरिकांचा टोपी व रुमाल देऊन सन्मान करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. उज्ज्वल वानखेडे यांना सैनिक स्कूल पुरस्कार, तर योगिता हिवराळे, मयुरी सोनुने, राणी पवार, यश जाधव, संजीवनी चव्हाण, प्रतिक्षा मुळे, अदिती धेवडे, निकिता अंभोरे यांना क्रीडा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.

याशिवाय, पत्रकारिता, आरोग्य, समाजसेवा, शिक्षण आणि पशुप्रेम या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. “सत्यशोधक लेखणीचा शिलेदार”, “मानवतेचा आरोग्यदूत”, “समाजसेवा गौरव”, “आदर्श शिक्षक” अशा विविध पुरस्कारांनी अनेकांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन गजानन चनेवार व संतोष अवसरमोल यांनी केले, तर डॉ. कृष्णा हावरे यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. दरम्यान, मान्यवरांची पारंपरिक बैलगाडीतून काढण्यात आलेली मिरवणूक हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि फुलांच्या उधळणीत ही मिरवणूक पार पडली. या उपक्रमातून ग्रामीण संस्कृतीचा सुंदर आविष्कार पाहायला मिळाला. एकूणच, घाटबोरी येथे पार पडलेला हा सोहळा सामाजिक ऐक्य, संस्कार आणि परंपरेचे जतन करणारा ठरला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top